पुणे अग्निशमन दलात नाही एकही महिला कर्मचारी
पुरोगामी पुण्यात सावित्रीच्या लेकींना मिळेना संधी
सुनील राऊत
पुणे – स्त्री-पुरुष समानतेची बीजे रोवत ज्या पुण्यात महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे सर्वांत आधी खुले झाले, त्याच पुण्याच्या अग्निशमन दलात एकाही महिला कर्मचाऱ्याची नेमणूक महापालिकेच्या स्थापनेपासून झालेली नाही. विशेष म्हणजे, महात्मा फुले स्मारकापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर दलाचे मुख्यालय आहे. मात्र, कधीही या क्षेत्रात महिलांना संधी देण्याची विचार महापालिका अथवा महापालिकेत आतापर्यंत सत्तेवर आलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला आलेला नाही.
देशाच्या संरक्षण विभागापासून ते अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. महावितरणसारख्या कठीण क्षेत्रातही महिला सरसावल्या आहेत. पण, अग्निशमन दलात संधी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दल सेवा प्रवेश नियमावलीस राज्य नगरविकास विभागाने नुकतीच मान्यता दिली असून रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. त्यामुळे या पदभरतीत तरी किमान महिलांना संधी देत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव महापालिका राखेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात केवळ मुंबई , पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिलांना या क्षेत्रात संधी दिली आहे.
स्थापनेपासून एकाही महिलेस संधी नाही
पुण्यात जवळपास 1884 पासून अग्निशमन दल अस्तित्त्वात असल्याच्या नोंदी आहेत. 1950 मध्ये महापालिका स्थापन झाली असली, तरी त्यापूर्वी शहरात तीन अग्निशमन केंद्र होती. त्यानंतर आसपासची 17 गावे महापालिकेत स्माविष्ट झाल्याने दलाचे कामकाज वाढले. त्यामुळे टप्प्याटप्याने महापालिकेने या विभागासाठी कर्मचारी नेमले. मात्र, महिलांना संधीच दिलेली नाही. शहराचा विस्तार आणि अग्निशमन दलाची गरज लक्षात घेऊन सुमारे 903 पदे मंजूर आहेत. त्यानुसार पालिकेने 1990 पासून जमेल तशी या पदांची भरती केली आहे. त्यात 1999, 2002, 2005, 2006, 2007 या कालावधीत अग्निशमन दलासाठी भरती करण्यात आली. मात्र, एकाही महिलेला संधी मिळालेली नाही. सध्या अग्निशमनदलाची 510 पदे रिक्त आहेत.
मुंबईत शासनाचे प्रशिक्षण केंद्र
अग्निशमन क्षेत्रात महिलांनाही कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. दरवर्षी या केंद्रात राज्यातील अनेक महिला प्रशिक्षण घेतात. मात्र, त्यानंतर पुणेच काय राज्यातील कोणत्याही महापालिकेत संधी मिळत नाही. वास्तविक प्रशिक्षणानंतर त्यांच्यासाठी या क्षेत्राचे दरवाजे उघडे होणे आवश्यक आहे. मात्र, धोक्याचे काम महिला करणार का? असा प्रतिगामी विचार करत महिलांना या क्षेत्रात संधी देण्यात प्रशासकीय व राजकीय उदासीनता दिसून येते.