* स्व.मधुकर शितोळे यांच्या पुतळ्यास अभिवादनाची परवानगी नाकारली
* दौंड पुरंदर प्रांतधिकारी यांचा आदेश
यवत : भीमा – पाटस सहकारी साखर कारखान्यातील मनी लॉन्ड्रीग प्रकरणी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज सभा होणार आहे. वरवंड येथील नागनाथ विद्यालयासमोर जाहीर पोलखोल सभा पार पडणार आहे. या सभेद्वारे संजय राऊत हे कारखान्यातील आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सभेला शिवसेनेचे उपनेत्या प्रा.सुषमा अंधारे, कसबा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार व दौंड तालुक्याचे सुपुत्र रवींद्र धंगेकर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सभेपूर्वीच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये यासाठी दौंड – पुरंदरचे प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी कारखाना आणि पाटस परिसरात कलम १४४ लागू केले आहे.
वरवंड येथील नागनाथ विद्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सभा होणार असून माजी आमदार रमेश थोरात यांच्या सहभागी सहकारी साखर कारखान्यात असणारा भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व.मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. मात्र या पुतळ्याला अभिवादन करण्याचे परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आली आहे.
पुतळा परिसर व कारखाना परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कारखाना आणि पाटस परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यामुळे सभेपूर्वीच तालुक्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहे.