वाल्ह्यात चरित्राचे वर्णन करीत हनुमान जयंती उत्साहात
वाल्हे – नाम मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत, हनुमान जन्माला, टाळ-मृदंगाच्या गजरात, सनईच्या सुरात फुलांची मुक्त उधळण करत श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी वाल्हे (ता.पुरंदर) येथे साजरा करण्यात आला.
वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच आरती, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, महाआरती, तसेच भजन, प्रसाद आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो वर्षापूर्वीची असलेली दक्षिण मुखी हनुमानाची मूर्ती असून, वाल्हेकर मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी करत असतात.
दरम्यान, मागील वर्षी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून, यामंदिरामध्ये नवग्रहच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरही पूर्ण हेमाडपंथी बांधण्यात आली असून ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हे काम करण्यात आले असल्याने हनुमान जयंतीला भाविकांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. पहाटे हनुमंत रायाच्या मूर्तीला पुजारी, सचिन आगलावे यांनी अभिषेक करून, विधिवत पूजा केली. सकाळी साडेसहा वाजता हनुमंताचा जन्म काळ होऊन फुले टाकण्यात आली. यानंतर सुंठवडा वाटण्यात आला. तर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
वागदरवाडी (ता.पुरंदर) येथे हनुमान जयंती निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शेवट हनुमान जयंतीनिमित्त काल्याच्या कीर्तनाने झाला. त्यानिमित्ताने वागदरवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भुजबळ कामठवाडी, हनुमान वस्ती येथेही ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.