* प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थ्यांना फटका
* “पीएमपीएमएल’ बससेवा बंद होण्याच्या हालचालींना वेग
* शटल बससेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
वाल्हे- हडपसर-नीरा मार्गावर ‘पीएमपीएल’ बससेवा 21 जानेवारी मोठा गाजावाजा करीत श्रेयवादासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीत वाल्हे, नीरा येथे पीएमपीएल बसचे जोरदार स्वागतात सुरू झाली होती. एका महिन्यात स्वारगेट- सासवड- नीरा शटलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवासी घायकुतीला आले आहेत.
एसटी महामंडळ व पीएमपीएमएल प्रशासनामध्ये झालेल्या वादामुळे पीएमपीएल सेवा बंद करण्याच्या भूमिकेत असतानाच सासवड एसटी आगाराने नव्याने नीरा ते स्वारगेट मार्गावर शटल बसच्या फेऱ्या वाढविल्या होत्या. जूनच्या सुरूवातीलाच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुणे महानगरपालिकेची “पीएमपीएमएल’ सेवा बंद होण्याच्या हालचालींना वेग आला होता.
यावेळी वाल्हे, नीरा, सासवड, हडपसर मार्गावरील गाव खेड्यातील प्रवासी मात्र याविरोधात आक्रमक झाले होते. एसटी नको पीएमपीएमएल बसच पाहिजे, या भूमिकेत होते. तर काहींनी पीएमपीएल बससेवेप्रमाणे एसटी विभागाने गावखेड्यात व वाडीवस्तीवर थांबा देऊन दर तासाला किंवा अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास स्वागत केले जाईल, अशीही भूमिका मांडली होती.
याला प्रतिसाद देत सासवड आगार व्यवस्थापक मनीषा इनामके व स्थानक प्रमुख इसाक सय्यद यांनी एसटीच्या विभागीय वरिष्ठांशी संपर्क करीत अशी सेवा सासवड आगार देऊ शकतो, असे आश्वासित केले. 8 जूनपासून ही शटल बस सेवा सुरू करण्यात आली होती. पीएमपील बसने जशी सेवा दिली त्याच पद्धतीने सासवड एसटी आगाराने आता कंबर कसली होती.
प्रवाशांना मागणी असेल तेथे थांबा अशी सेवा सुरू केली होती. विद्यार्थ्यांना सवलतीची सोय होती. मात्र, काही दिवसांपासून ही शटल बस सेवा रस्त्यावर दिसेनाशी झाली होती. परिणामी विद्यार्थी, कामगार, प्रवासी, नागरिकांचे ऐन पावसाळ्यात शटल बससेवेमुळे गैरसोय होऊ लागली होती. यामुळे, स्वारगेट- सासवड – नीरा शटल बससेवा पूर्ववत सुरू होण्याबाबतचा पत्रव्यहार विभागीय नियंत्रक राज्य परिवहन पुणे येथील रमाकांत गायकवाड यांना भाजपचे प्रदेश ओबीसीचे उपाध्यक्ष सचिन लंबाते यांनी पत्रव्यहार केल्याची माहिती लंबाते यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून यांचा फटका एसटी बसच्या उत्पन्नास बसत आहे. पाऊस पडत असल्याने प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. मागील महिनाभरापासून स्वारगेट- सासवड- नीरा शटल बससेवा सुरू केली आहे. मार्गावरून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने, व पाऊस असल्याने उत्पन्नात अजूनच घट होत आहे. तसेच खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने काही शटल बस हे काही दिवसांसाठी स्थगित ठेवल्या होत्या. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने व प्रवाशांशी प्रतिसाद पाहून शनिवार (दि.16) पासून टप्प्या-टप्प्याने शटल बससेवा सुरू केली आहे. पुन्हा शटल बस सेवा पूर्ववत सुरू होईल.
– मनीषा इनामके, आगार व्यवस्थापक, सासवड.