शिरूर विधानसभा मतदारसंघात दौरा : तळेगावात कार्यकर्त्यांची घेतली भेट
तळेगाव ढमढेरे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनीही कंबरेला पदर खोवत पक्षवाढीसाठी दौरे सुरू केले असल्याचे पाहायला मिळत. नुकताच सुनेत्रा पवार शिरूर विधानसभा मतदारसंघात दौरा करत कार्यकर्त्यांची भेट घेतली.
शिरूर शहर व रांजणगाव गणपती येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. शिरूर तालुका दौरा उरकल्यानंतर तळेगाव ढमढेरे येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाजभूषण स्व. किसनभाऊ भुजबळ यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी पवार तळेगाव ढमढेरे येथे आल्या होत्या.
शिरूर पंचायत समितीच्या सभापती तसेच शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा आरती भुजबळ यांनी तालुक्यातील महिला संघटन व सबलिकरण याविषयी माहिती सांगितली.तालुक्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे पवार यांनी आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणीचे लोचन शिवले, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्ष रवी काळे, महिलाध्यक्षा आरती भुजबळ, युवती अध्यक्ष तर्णिका कर्डीले, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, तळेगाव ढमढेरे माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश भुजबळ, चंद्रकांत भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भुजबळ उपस्थिती होते.