चालक जखमी : पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात
मंचर – पुणे- नाशिक महामार्गावर स्विफ्ट कार, कंटेनर, मालवाहतूक टेम्पो या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात स्विफ्ट कारने पेट घेतल्याने कारमधील तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. १७) पहाटे सहाच्या सुमारास मंचरजवळील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे घडला. दरम्यान, स्विफ्ट कार पूर्णपणे जळून खाक झाली असून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्विफ्ट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश ऊर्फ अनिकेत ज्ञानेश्वर भांबुरे (वय ३२), वीरेंद्र विजय कदम (दोघेही राजगुरूनगर), रोहिदास लक्ष्मण राक्षे (रा. राक्षेवाडी ता. खेड) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर दत्तात्रय चंद्रकांत गोतारणे (वय 32 रा. राजगुरूनगर) या स्विफ्ट चालकावर गुन्हा दाखल केला असून तो जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर सिद्धार्थ दीपकराव मोहोळ (वय २५, रा. बोधेगाव ता. दारव्हा, जि. यवतमाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
पुण्याच्या दिशेने जाणारा कंटेनर (जीजे ०१ डब्ल्यू बी १७३७) हा बंद अवस्थेत उभा होता. दरम्यानच्या काळात पुण्याहून नाशिककडे जाणारा आयशर टेम्पो (एमएच १२ क्यूजी ३३५१) येत असताना बाजूच्या लेनवरून भरधाव वेगात असलेली स्विफ्ट (एमएच १४ डीटी ०२९५) कार रॉंग साईडच्या लेनवर आल्याने टेम्पोची तिला धडक बसली.
तसेच मालवाहतूक टेम्पो नाशिक ते पुणे जाणारे लेनवरून विरुद्ध बाजूला जाऊन उभ्या असलेल्या कंटेनरला धडकला. दरम्यान, स्विफ्ट कारने पेट घेतला मात्र कारमधील तिघांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे करत आहे.