पावसाअभावी पुरंदरमधील बळीराजा हवालदिल
काही भागात ज्वारीची उगवण नाही तर काही भागात कसापर्यंत आलीच नाही
बेलसर – पुरंदर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांच्या आकडेवारीत दरवर्षीच्या तुलनेत मोठी तफावत जाणवत आहे. तर या पेरणी अहवालावरून सद्यस्थितीला काढणी सुरू असलेले ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. तर रब्बी हंगामात ज्वारीची 90 टक्के पेरणी झाली असली तरी पावसाअभावी कडबा व धान्याच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये गहू पेरणीचे प्रमाण कमी होऊन जिरायती व बागायती क्षेत्रांवर ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली गेली; परंतु रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अत्यंत कमी पाऊस पडल्याने पेरणी झालेली ज्वारी उगवलीच नाही व उगवलेली ज्वारी कणसापर्यंत आलीच नाही. त्यामुळे पेरणी अधिक झाली असली तरी ज्वारीपासून मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी असलेले चित्र निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा जवळपास अपेक्षित सरासरी पेरणी क्षेत्रांपैकी जवळपास 90.83 टक्के पेरणी पूर्ण झाली होती; परंतु पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ज्वारी पिक हे बहुतांश भागात जळून गेले त्यामुळे रानात पेरले गेलेले ज्वारी काढणीला आलीच नाही.
पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, राजेवाडी, वाघापूर, गराडे, वीर, परींचे, बेलसर, वाल्हे, नीरा, जेजुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली गेली; परंतु सध्या ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. तर मळणीही सुरू झाली आहे. अत्यंत कमी उंचीचा कडबा व कमी दाणे असलेली कणसे यामुळे शेतकर्यांसमोर ज्वारीच्या उत्पन्नाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये यंदाच्या हंगामात 17 हजार 483 सरासरी क्षेत्रांपैकी 15 हजार 881 क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजे जवळपास 90.83 टक्के क्षेत्रावर ज्वारी पिकाची दगडी व मालदांडी तसेच इतर वानांची पेरणी झाली होती.
असे असते गणित
कोरडवाहू रब्बी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी 650 ते 750 केजी असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न 1,200 ते 1,800 केजी असते. भारी जमिनीत ते हेक्टरी 4 हजार केजी पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी 20 टन आणि भारी जमिनीत 30 ते 35 टन मिळते; परंतु यंदा उत्पन्नच्या बाबतीत मोठी घट होणार असल्याचे दिसुन येत आहे.
कडब्याचे व ज्वारीचे बाजार भाव वाढणार
यंदाच्या हंगामात ज्वारी पिक चांगले आले नसल्यामुळे कमी उंचीचा कडबा व मिळालेले ज्वारीचे उत्पन्न हे भाव खाणार असल्याची माहिती शेतकरी देत आहेत.सध्या कडबा 3 हजार रुपये प्रती शेकडा विकला जात आहे.
मजुरीही परवडेना
ज्वारी काढण्यासाठी महिला मजुरांना 350 रुपये प्रती दिवस तर कणीस काठणीसाठी 300 रुपये प्रती दिन पैसे मोजावे लागत आहेत.
ज्वारी पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)
वर्ष सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्के
2023-24 17483.1 15881 8 90.83
2022-23 22354 14382 9 64.34