पुणे – नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून हवालाचे ४५ लाख रुपये लुटणार्या पुणे शहर पोलीस दलातील तिघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. भिवंडीतील एका व्यापार्याची ही रोकड होती. पोलीस शिपाई गणेश कांबळे, गणेश शिंदे, दिलीप पिलाणे अशी या लुटारू पोलिसांची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली आहे.
हे तिघेजण दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. त्यांनी ८ मार्च २०२२ रोजी हा कारनामा केला होता. या तिघांविरुद्ध नरपोली-भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा आहे. घटनेनंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. बाबुभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकमार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश कांबळे याला मिळाली होते.
त्याने गणेश शिंदे आणि दिलीप पिलाणे यांच्याशी संगनमत करुन कट रचला आणि परस्पर दिवे गावात हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडवली आणि पोलीस असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवली. यानंतर ४५ लाख रुपये लुटले. या तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, अटक टाळण्यासाठी गणेश कांबळे याने पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन आजारी असल्याचे सांगितले. सुट्टीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडी येथे गंभीर गुन्हा केला.
गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात सुट्टी मिळाली नाही म्हणून साप्ताहिक सुट्टी घेतो, असे कारण दाखवत भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाले.
व्यापाऱ्याच्या मेहुण्याने दिली होती टिप
व्यापारी रामलाल परमार (५९ , रा. बंगला गल्ली, करमाड, ता. जि. औरंगाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली होती, यातील एक अटक आरोपीचे नाव सोलंकी असून तो परमार यांचा मेहुणा आहे. सोलंकी आणि उपरोक्त पोलीस कर्मचाऱ्यांचा परिचय आहे. त्यातूनच सोलंकी याने परमार हे मोठी रोकड घेऊन भिवंडी येथून जाणे-येणे करत असतात, अशी माहिती त्यांना दिली. त्यानंतर चौघांनी मिळून रोकड लुटण्याची योजना आखली. परमार हे दि. ८ मार्च रोजी कारमधून रोकड घेऊन मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी नरपोली हद्दीत हा प्रकार घडला.
तांत्रिक विश्लेषणावरून तपास
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी माहिती काढली. त्यावेळी सोलंकी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता गणेश शिंदे, गणेश कांबळे व मारुती पिलाणे या तीन पोलिसांच्या साथीने परमार यांना लुटल्याची कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली.