सातारा – बाल लैंगिक अत्याचाराविषयी आश्रमशाळांमध्ये जाणीव जागृती होणे ही काळाची गरज आहे, असे मत इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक आयुक्त नितीन उबाळे यांनी व्यक्त केले.
सुवर्धिनी फाऊंडेशन, सातारा व इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी पोक्सो कायदा जागृती व प्रशिक्षण कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून प्रशिक्षणार्थींना नितीन उबाळे मार्गदर्शन करत होते. आश्रमशाळातील बालके दुस-याची आहेत याचा विचार न करता ती आपलीच मुले आहेत असे समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे आवाहन नितीन उबाळे यांनी यावेळी शिक्षकांना केले.
पोक्सो कायदा प्रशिक्षण कार्यशाळेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) मधील कायदेशीर तरतुदींविषयीची माहिती ॲड. डॉ. सुचित्रा घोगरे- काटकर यांनी दिली. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बालकांचे संरक्षण, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर या विषयावर सायबर सुरक्षा तज्ज्ञ अभियंता वैशाली मंडपे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच पिडीत व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे परिणाम, लैंगिक अत्याचारग्रस्त बालक कसे ओळखावे या विषयावर डॉ. धनश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा के. बी. पी. इंजिनिअरिंग महाविद्यालच्या सभागृहात पार पडली. सुवर्धिनीच्या संचालिका शुभांगी दळवी यांनी प्रास्ताविक केले व आभारही मानले. या कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे अधिकारी सुनील कर्चे, सुवर्धिनी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. शुभांगी काटकर, प्रवीण काटकर, ॲड. भाग्यश्री बोकेफोडे, गीतेश ओंबाळे तसेच जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील दोनशेहून अधिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.