प्रधानमंत्री जीवनज्योती विम्याचे दोन लाख वर्ग
वाघापूर : असे म्हणतात की आई कुठेही असली तरी तिचे आपल्या लेकरांवर कायम लक्ष असते. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला कायमच पहायला मिळालेला आहे. मग ती मानव असो वा प्राणी. काहीशी अशीच घटना पुरंदर तालुक्यात घडली आहे. येथील एका आईने मृत्यूपूर्वी बँकेत आपले खाते उघडताना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा विमा या विमा पॉलिसी घेतल्या होत्या. त्यांनी दाखवलेला हाच शहाणपणा तिच्या लेकराच्या शिक्षणासाठी आधार ठरला आहे.
आंबळे (ता. पुरंदर) येथील शुभांगी गुलाब दरेकर यांच नुकतच काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. इहलोकीची यात्रा संपवून गेलेला माणूस परत येत नसतो, मात्र त्याने अनवधानाने केलेले एखादे काम त्या व्यक्तीची दूरदृष्टी समोर आणत असते.
स्व. शुभांगी दरेकर यांनी देखील पिसर्वे येथील बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते उघडताना प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या पॉलिसी घेतल्या होत्या. आज त्याच पॉलिसी त्यांच्या पश्चात त्यांच्या लेकराच्या शिक्षणासाठी आधार ठरल्या आहेत.
स्व. दरेकर यांच्या मृत्यू नंतर बँक ऑफ इंडियाच्या पिसर्वे येथील यशवर्धन इ-ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून शाखाधिकारी रुक्सना आतार यांनी दरेकर यांच्या नातेवाइक व वारसांशी संपर्क साधून त्यांच्या मृत्यू संदर्भातील कागदपत्रे मागवली होती. व ती पुढे स्टार युनियन डायइची या विमा कंपनीकडे पाठवून त्याचा पाठपुरावा देखील केला होता.
विमा कंपनीने त्यांचा हा दावा नुकताच मान्य केला. दिवंगत शुभांगी दरेकर यांचा वारसदार त्यांचा मुलगा केतन गुलाब दरेकर यांच्या नावाने प्रधानमंत्री जीवनज्योती विम्याचा दोन लाख रुपयांचा विमा मंजूर केला असून ही रक्कम त्याच्या शिक्षणासाठी खर्च केली जाणार असल्याचे गुलाब दरेकर यांनी सांगितले.