पुणे – सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग) हा टाळता येण्याजोगा आणि उपचारांनी बरा होऊ शकणारा आजार आहे. त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती झाली तर अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतील, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
याबाबत आॅब्स्टट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सिनियर कन्सल्टन्ट डॉ. वर्षाली माळी यांनी सांगितले की, सर्व्हायकल कॅन्सर लसीकरणामध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या काही स्ट्रेन्सविरोधात संरक्षण पुरवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या लसींचा समावेश असतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा लैंगिक संबंधांमधून पसरणारा संसर्ग असून त्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो.
गार्डसील आणि सर्व्हरिक्स यासारख्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या लसी बहुतांश सर्व्हायकल केसेसना कारणीभूत ठरणाऱ्या, अति जोखमीच्या एचपीव्ही टाइप १६ आणि १८ ना टार्गेट करतात. कोणत्याही लैंगिक संबंधांना सुरुवात होण्यापूर्वी, किशोरवयात असताना या लसी दिल्या गेल्यास सर्वात जास्त प्रभावी ठरतात. त्यामुळे ९ ते २६ वर्षे वयोगटातील मुलींना या लसी देण्याचा सल्ला दिला जातो.
एचपीव्हीविरोधात रोगप्रतिकार शक्ती वाढवून हे लसीकरण सातत्यपूर्ण संसर्गांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकते आणि अशाप्रकारे सर्व्हायकल विकृती, खासकरून सर्व्हायकल कॅन्सर होणे टाळले जाऊ शकते. लसीकरण करवून घेतलेले असले, तरीही पॅप स्मियरसारख्या तपासण्या नियमित करवून घेणे महत्त्वाचे आहे.
कारण, या लसी सर्व्हायकल कॅन्सरशी संबंधित सर्व एचपीव्ही स्ट्रेन्सना आळा घालू शकत नाहीत. लसीकरण लवकरात लवकर करून घेणे आणि सर्वांगीण आरोग्याची देखभाल करणे या दोन्ही गोष्टी सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे डॉ. वर्षाली माळी यांनी सांगितले.