सातारा – सर धनजीशा बोमनजी कूपर यांच्या स्मृती निमित्त आय.एम.टी.एम.ए. कूपर पारितोषिक दरवर्षी सस्टेनेबल सप्लाय चेन या विभागातील अति उत्कृष्ट काम केलेल्या उद्योगास दिले जाते. अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर यांनी आपल्या आजोबा सर धनजीशा बोमनजी कूपर यांच्या स्मृती निमित्त सदरील पारितोषिकाची आय.एम.टी.एम.ए.च्या मदतीने प्रस्थापना केलेली आहे. नुकतेच बंगळुरू येथे आय.एम.टी.एम.ए. यांनी आयोजलेल्या आंतरराष्ट्रीय इमटेक्स फॉर्मिंग-2024 या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी इमटेक्स कूपर हे पहिले पारितोषिक हे युकॅम इंडस्ट्री, बेंगलुरू यांना प्रदान केले गेले.
हे पारितोषिक टायटन इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. व्यंकटरमन, गोदरेज इंडस्ट्रीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जमशेद गोदरेज, किर्लोस्कर सिस्टिम लि.च्या संचालिका श्रीमती गीतांजली किर्लोस्कर, आय.एम.टी.एम.ए.चे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र राजमाने व सी.इ.ओ. जिबक दासगुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. चे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे हे उपस्थित होते.
पारितोषिकाबद्दल भावना व्यक्त करताना फरोख कूपर म्हणाले, ऐतिहासिक वारसा असलेल्या कूपर घराण्यातील कूपर उद्योगाची पायाभरणी करणारे माझे आजोबा सर धनजीशा बोमनजी कूपर यांच्या नावाने हे पारितोषिक सुरू करताना मला अत्यंत आनंद होत आहे. कूपरने सातारा व महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला आहे व त्याचे सर्वांनी कौतुक केले आहे. मी साता-याच्या मातीतला भूमीपुत्र व हाडाचा शेतकरी आहे. सातार्याच्या जी.डी.पी. मध्ये कूपर उद्योगाचा मोठा वाटा राहिला आहे, सातार्यातील लोकांनी माझा वेळोवेळी सन्मान करून मला मोठे पाठबळ दिले आहे. स्थानिक कर्मचारी व कामगार हेच माझ्या उद्योगाचा कणा आहे.
इतर उद्योगांना पारितोषिकाच्या माध्यमातून प्रोत्साहन देणे, हा या पारितोषिकाचा हेतू आहे. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आय.एम.टी.एम.ए.) ही उद्योग जगातील मशीन टूल मॅन्युफॅक्चरींग संबंधित उद्योजकांची शिखर संस्था असून 1946 पासून भारताच्या अॅटो उद्योगांचा कणा बनली आहे. कूपर उद्योगाचे पितामह सर धनजीशा बोमनजी कूपर हे या संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते. संस्थेच्या माध्यमातून मशीन टूल उद्योगांच्या विकास व वृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. संस्थेच्या अनेक विविध उपक्रमांमध्ये धोरणात्मक निर्णयात शासनास मदत करणे, निर्यातवृद्धी, आंतरराष्ट्रीय दर्जाची उद्योग प्रदर्शने आयोजन, प्रशिक्षण, तांत्रिक विकासासंबंधी प्रकाशने इ. यांचा समावेश आहे.