शिवरीत बैलगाडा शर्यतीत ढिसाळ नियोजन : लक्ष्या, मिलखा जखमी
सासवड – शिवरी (ता. पुरंदर) येथे बैलगाडा शर्यतीमध्ये विहिरीत पडून शर्यतीतील बैल ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संग्राम 3155 हा बैल या शर्यतीमध्ये दुर्दैवाने ट्रॅक शेजारी असणाऱ्या विहिरीत पडून जागीच ठार झाला. तर लक्ष्या व मिलखा जखमी झाले आहेत. आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा बैल विहिरीत पडला असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवरीतील या बैलगाडा स्पर्धेच्या आयोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ढिसाळ नियोजन हेच संग्रामचा बळी घेण्यास कारणीभूत ठरला आहे, त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी बैलगाडाप्रेमींकडून केली जात आहे.
ज्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केली जाते त्या ठिकाणाची पाहणी व ना हरकत दाखले तहसीलदार, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन पशुवैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग गटविकास अधिकाऱ्यांच्याकडून घेतले जातात. तर यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बैलगाडा ट्रॅकची पाहणी करून बैलगाड्यासाठी ट्रॅक योग्य किंवा अयोग्य आहे. त्याचबरोबर शर्यतीसाठी 1 हजार मीटर लांबीचे अंतर धावण्यासाठी निश्चित केले जाते. अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या मैदानाला भेट देऊन त्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले गेले आहे का नाही हे पाहणे आवश्यक असते; परंतु यांनी शिवरी येथील स्पर्धेला दिलेल्या या परवानगीवरच आक्षेप असल्याची चर्चा सध्या परिसरात आहे.
ज्यावेळी संग्राम विहिरीमध्ये पडला आणि तो मरण पावला त्यानंतर स्पर्धा थांबवा आसा आग्रह बैलगाडा मालकांकडून होत होता; परंतु आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले व स्पर्धा पुढे चालू ठेवली आणि सत्कार समारंभ चालू ठेवले मुक्या जनावरांना देखील माणुसकीची वागणूक मिळायला हवी हेच आयोजक विसरले, असे गंभीर आरोप आता बैलगाडा मालकांकडून होत आहे.
बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे टीम असणे गरजेचे आहे; परंतु या ठिकाणी पशुवैद्यकीय टीम उपलब्ध नसल्याने जखमी बैलांवर उपचार करण्यासाठी बैलगाडा मालकांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले असल्याची चर्चा देखील सध्या रंगत आहे.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानाचे नियोजन अत्यंत चोख बजावलेले होते. ही विहिरी 1000 फूट लांब आहे. तर ज्यावेळी बैलगाडा विहिरीमध्ये पडला त्यावेळी त्याच्या ड्रायव्हरने पाठीमागेच उडी मारली होती. व विहिरीच्या कडेला पोकलेन व जेसीपी तटबंदी केलेली होती.
– संतोष लिंभोरे, आयोजक, बैलगाडा शर्यत