बारामती – बारामती गेल्या एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेमधील बारामतीतील 334 घरांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी माहिती दिली. बारामती नगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक चार (स्वमालकीच्या जागेवर घरनिर्मिती) अंतर्गत प्रस्ताव तयार केलेला होता.
ऑक्टोबर 2022 मध्ये टप्पा क्रमांक पाचमध्ये 105 घरकुलांचा तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये टप्पा क्रमांक सहामध्ये 229 अशा एकूण 334 घरकुलांचा प्रस्ताव शासन मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. सर्व 334 घरकुलांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाची अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे.
बारामती शहरात उभारण्यात येणाऱ्या घरांसाठी केंद्र सरकारने आठ कोटी 35 लाख रुपयांचे अनुदानही मंजूर केलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत, त्यांनी घराचे बांधकाम सुरु करुन अनुदानाचे प्रस्ताव नगरपालिकेकडे दाखल करावेत, असे आवाहन महेश रोकडे यांनी केले आहे.
मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की, ज्याच्याकडे किमान एक गुंठा जागा आहे. त्यावर 325 स्क्वेअर फूटांचे बांधकाम केल्यावर सामान्य नागरिकांना अडीच लाख व दिव्यांगाना साडेतीन लाख रुपयांचे अनुदान प्रदान केले जाते. योजनेअंतर्गत बारामती शहरात वरील 334 घरकुलांचा समावेश करुन आतापर्यंत 834 घरांना योजनेअंतर्गत अनुदान प्रदान केले आहे.
नागरिकांनी प्रस्ताव सादर करावेत. ज्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे, अशा लाभार्थ्यांनी बांधकाम सुरु करुन विहीत नमुन्यात अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत.