कार्यक्रमाची तयारी : समाधी स्थळावर हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी होणार
कोरेगाव भीमा – श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा ३३५ वा पुण्यतिथी कार्यक्रम भव्य स्वरूपात होण्यासाठी श्री क्षेत्र वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती व धर्मवीर संभाजीराजे युवा मंचाने तयारी सुरु केली आहे.
प्रथेप्रमाणे फाल्गुन अमावास्येला दि. ८ एप्रिल रोजी होणाऱ्या ३३५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह महाराजांचे वंशज लक्षराज सिंह महाराज, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे, शंकर गायकर, राहुल सोलापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुण्यतिथीदिनी स्मृती समितीच्या वतीने पहाटे समाधीची महापूजा, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने मूक पदयात्रा, सकाळी ८ वाजता शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा, सकाळी १० ते ११ हभप संग्राम बापू भंडारे यांचे धर्मवीर श्री शंभू छत्रपतींचे बलिदान या विषयावर सुश्राव्य कीर्तन, सशस्त्र मानवंदना व शासकीय मानवंदना होणार आहे.
सकाळी ११:३० वाजता समाधीवर हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. सकाळी ११:४५ ला धर्मसभा तर रात्री धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या वतीने ” इथे ओशाळला मृत्यू ” या नाटकाचा प्रयोग होणार आहे. युवा मंचच्या वतीने दिवसभर रक्तदान व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरम्यान, समाधीस्थळी चंद्रकांत शहासने यांचे २००० देशभक्त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन असणार आहे.
पुरस्कारांचे मानकरी
राकेश दुलगज – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार, पत्रकार शरद पाबळे – शंभू सेवा पुरस्कार
अक्षय महाराज भोसले – शंभू सेवा पुरस्कार, लेखक निलेश भिसे – शंभू सेवा पुरस्कार, दत्ता बुट्टे आणि मित्रपरिवार – शंभू सेवा पुरस्कार
शासनाचा आराखडा समाधीस्थळाला साजेसा असावा
शासनाने तयार केलेला आराखडा हा समाधीस्थळ हे तीर्थक्षेत्र असल्याचे डोळ्यासमोर ठेऊन करावा. तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळ होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी. समाधीस्थळी येताना प्रत्येकाने पावित्र्य आणि मांगल्य जपूनच या ठिकाणी येण्याचे आवाहन स्मृती समिती व युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. फाल्गुन अमावस्येला धर्मवीर दिन म्हणून घोषित करण्याची मागणी देखील करण्यात आली.