पारंपरिक विरोधकांबरोबर शरद पवार यांचा संवाद
दिगंबर पडकर
जळोची – गेल्या ५७ वर्षांपासून राज्याच्या राजकारणात पवार काकडे संघर्ष राज्याने पाहिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय प्रतिस्पर्धी असणारे कै. मुगुटराव काकडे, कै. संभाजीराव काकडे कै. बाबालाल काकडे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. गेल्या १५ दिवसांत शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पारंपरिक विरोधकांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर बारामतीची समीकरणे बदलली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकांविरोधात बंड केल्याने या भेटीमागे बेरेजेचे वलय असल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तगडे आव्हान उभे केल्याने शरद पवार यांनी बेरजेच्या राजकारणाला सुरूवात केली आहे. शरद पवार यांनी पहिल्यांदा भोरच्या भूमीत माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन सलामी दिली होती. त्यानंतर शरद पवार यांनी दौंड, पुरंदर, इंदापूर तालुक्यात हा डावपेच आखला आहे.
गेल्या महिन्याभरात शरद पवार यांनी सात ते आठ जणांची भेट घेतली आहे. यात पारंपरिक विरोधक, इतर पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यात दोन शिलेदार हे शरद पवार यांच्या तंबूत दाखल झाले आहे. थोपटे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वसंत मोरे, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष ताकवणे, माळेगावचे चंद्रहार तावरे यांचा समावेश आहे.
अजित पवार यांनी साथ सोडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यात घट येणार असल्याने शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. यात त्यांनी मोठ्या पॉकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. सुळे यांना मागील निवडणुकीत दीड लाखांचे मताधिक्य मिळाल्यानंतर हे मताधिक्य घटणार आहे.
बारामतीच्या आणि राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काकडे कुटुंबाच्या घरी खासदार शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा झाली आहे. १९६७ पासून राज्याच्या विविध निवडणुकीत पवार -काकडे संघर्ष टोकाला गेलेला होता.
दोन कुटुंबातील संघर्षाला पूर्णविराम
सोमेश्वर कारखाना निवडणुकीतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलने वेळोवेळी काकडे गटाला मात दिली. शेतकरी कृती समितीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्ष पाच वर्षांपूर्वी संपल्यानंतर काकडे कुटुंबाने अजित पवार यांना निवडणुकीत वेळोवेळी मदत केली आहे. पवार- काकडे हा संघर्ष सर्वांना न्यात होता. या संघर्षाची धार आता कमी झालेली दिसत आहे.
अजित पवारांचे काकडे कुटुंबीयाशी सख्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विकासकामांच्या निमित्ताने निंबुत येथे अनेकदा भेटी दिल्या आहेत. अजित पवार यांनी मागील पाच वर्षापासून काकडे कुटुंबीयांची जुळवून घेत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधी दिली आहे. पवारांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकी लढवली होती. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर आता तब्बल ५७ वर्षानंतर शरद पवार यांनी काकडे कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.