सासवडमध्ये : पालखी आज जेजुरी मुक्कामी
सासवड – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा सासवड नगरी दोन दिवसांचा मुक्कामानंतर शुक्रवारी (दि. 15) श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानकाका महाराज यांच्या दर्शनासाठी सासवड येथे लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासून दर्शनाला लांबच लांब रांगा लावल्या होत्या. हा पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 16) जेजुरीनगरीत मुक्कामासाठी जाणार आहे. पहाटे 5 वाजता पालखी तळावर माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात येईल. जेजुरी मुक्कामाकडे सकाळी पालखीचे प्रस्थान होईल.
सासवड नगरीत विविध प्रकारची खेळणी, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती. यावर्षी पालखीकाळात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी मात्र चिंतेच्या वातावरण असल्याचे बोलून दाखवले. हा पालखी सोहळा कोरडा जाऊ नये अशी प्रार्थना यावेळी भाविकांनी केली.
नगरपालिकेच्या वतीने पालखी तळावर विद्युत रोषणाई, दर्शन बारी, स्वयंसेवक, आरोग्य, पाणीपुरवठा आदींसह नियंत्रण कक्षाद्वारे हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि आलेल्या व भाविकांचे स्वागत करण्यात आले. दोन दिवस अखंडित वीजपुरवठा पुरेसा गॅस सिलिंडर तसेच औषधांची उपलब्धता करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.