पुणे जिल्हा: रब्बीतील गहू, हरभरा क्षेत्र वाढले

चांगल्या पावसाचा परिणाम ः ज्वारीच्या क्षेत्रात मात्र घट

रांजणी -आंबेगाव तालुक्‍यात चालूवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या हरभरा आणि गहू पिकांमध्ये ही वाढ झाली आहे. यंदा चांगला पाऊस असल्याने रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या गहू आणि हरभरा पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे तर ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. तालुक्‍यात यंदा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या गहू आणि हरभरा पीक घेण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. 

वास्तविक पाहता उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी रब्बी हंगामात तालुक्‍यातील शेतकरी कांदा पीक घेत असतात; परंतु यंदा शेतकऱ्यांनी कांदा पिकाबरोबरच गहू आणि हरभरा पीक घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. खरे तर आंबेगाव तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक ऊस आणि कांदा आहे परंतु शेतकऱ्यांनी चालू वर्षी गहु आणि हरभरा पिकाच्या माध्यमातून नवीन प्रयोग घेण्याचे ठरवल्याचे दिसून येते दसरा झाल्यानंतर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकाची पेरणी होते. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भाग सोडला तर पूर्व भागात सुमारे सहा ते सात हजार हेक्‍टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी गहु आणि हरभरा पीक घेण्याचा प्रयोग राबवला असल्याचे दिसून येते. यावर्षी गहू आणि हरभरा पिकाला हवामान पोषक असल्याने उत्पादनही चांगल्या प्रकारचे मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षात खरिपातील बाजरी पीक शेतकरी घेत नाही. कारण उन्हाळ्यात बाजरीचे पीक घेतले जाते. त्यामुळे यंदा देखील तालुक्‍यात खरीप हंगामातील बाजरी पिकाचे उत्पादन अगदीच नगण्य होते; परंतु रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहु आणि हरभऱ्याचा प्रयोग राबवण्याचे चित्र पहावयास मिळते. 

कृषी तज्ञांच्या मते रब्बी हंगामातील ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी हे चार महिने गहू आणि हरभरा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. रोगराईचा प्रादुर्भाव झाला नाही तर निश्‍चितच यंदा तालुक्‍यात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात गव्हाचे धान्य उपलब्ध होईल. सध्या गव्हाला प्रतिकिलो पंचवीस ते तीस रुपये असा बाजारभाव आहे. साधारणतः पाच हजार रुपये प्रति एकरी गहू उत्पादन घेण्याचा खर्च होतो.

गव्हाचे उत्पादन वाढणार
हरभरा पीक घेण्यासाठी एकरी दोन हजार रूपये खर्च होतो; मात्र शेतात पीक घेत असताना एकरी15 ते 20 क्विंटल गहू उत्पादन निघत असत तर हरभरा पिकाचे 4 ते 5 क्विंटल उत्पादन मिळते. गहू पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती होईल, असे कृषीतज्ञांचे मत आहे.

रब्बी हंगामाचा विचार केला असता बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीतील कांदा पीक घेत असतानाच गहु आणि हरभरा पिकाला प्रामुख्याने प्राधान्य दिले आहे. सध्या हरभऱ्याचे भाव वाढले आहेत. हरभऱ्याची डाळ 60 ते 70 रुपये किलो प्रमाणे बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे हरभरा पिकाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्‌या चांगला फायदा होईल.
-तुषार थोरात, शेतकरी चांडोली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.