राजकीय फलकांवर कारवाईचा विसर
पुणे – शिक्षक आणि पदवीधर विधानसभा मतदारसंघाची आचारसंहिता जाहीर होऊन आठवडा झाला तरी महापालिकेस शहरातील राजकीय तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्सवर कारवाई करण्यास मुहुर्त मिळालेला नाही. विशेष म्हणजे शहराच्या प्रमुख चौकांमध्ये राजकीय नेत्यांचे फलक झळकत असल्याने पालिकाच या जाहिरातबाजांना अभय देत आदर्श आचारसंहितेला हरताळ फासत असल्याचे समोर आले आहे.
पदवीधर व शिक्षक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूका दि. 1 डिसेंबरला होत आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू होऊन एक आठवडा झाला आहे. या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासनाने स्पष्ट सूचना काढलेल्या असून त्यात, महापालिकेने शहरात राजकीय जाहिरातींचे अनधिकृत फ्लेक्स, फलक, बॅनर्स लागणार नाहीत, तसेच लागलेले असल्यास ते 24 तासांच्या आत काढण्याच्या सूचना आहेत.
आकाशचिन्ह विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनाही याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, काही क्षेत्रीय कार्यालयांनीच अनधिकृत जाहिरातींवर कारवाई केली असून अद्यापही शहरात राजकीय जाहिराती दिसत आहेत.