आमदार अशोक पवार यांचा शरद पवारांना पाठिंबा
लोणीकंद – विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी 2 जुलैला राजभवनावर मंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हेदेखील या शपथ विधीला हजर असल्याने त्यांचा ही अजित पवारांनाच पाठिंबा आहे असं शिरूरच्या जनतेनी समजून घेतलं; मात्र 5 जुलैच्या शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी घेतलेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या मीटिंग मध्ये अशोक पवार मात्र शरद पवारांच्या मीटिंगला हजर असल्याने ते नक्की कोणत्या शरद पवार गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले. याचा आपसुकच फायदा त्यांचे विरोधक प्रदीप कंद यांना होणार असल्याचे भाजप कार्यकर्ते सांगत आहेत.
भाजपाकडून इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांना अजित पवारांसोबत अशोक पवार देखील शपथ विधीला असल्याने आगामी आमदारकीच्या निवडणुकीत शिरूर हवेली विधानसभा मतदार संघ भाजपा, शिवसेना की विद्यमान आमदार असलेल्या अजित पवार गटाला मिळणार याचे टेन्शन आलेच असणार; मात्र दोनच दिवसात अशोक पवार शरद पवारांच्या गटात सामील झाल्याने आगामी विधानसभा निवडणूक ही शरद पवार गट विरुद्ध भाजपा अशीच पाहायला मिळणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.
साहेब आमचे आणि दादाही आमचेच
शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमुळे शिरूर-हवेलीमधील राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र जरा चिंतेतच दिसून येत आहे. दोन्ही तालुक्यांतील मातब्बर नेत्यांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे साहेबांपेक्षा दादांसोबत जवळीक जास्त आहे; मात्र दादांसोबत गेलो तर आगामी निवडणुकीत संधी मिळण्याचे शक्यता कमी आणि साहेबांसोबत गेलो तरी अडचणी. त्यामुळे शिरूर-हवेलीतील नेते आणि कार्यकर्ते सध्यातरी दादा आणि साहेब आमचेच असल्याचे बोलत आहेत.
दादांचा वाढदिवस जल्लोषात होणार?
येत्या 22 जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस.. सध्याच्या राजकीय घडामोडी होण्याअगोदर पक्ष श्रेष्ठींकडून अजित दादांचा (तत्कालीन विरोधी पक्ष नेते) वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, असे सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता दादांचा वाढदिवस कोणते कार्यकर्ते साजरा करणार आणि कोणते नाही हे मात्र 22 तारखेलाच समजणार.