पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुळा नदी सुधार प्रकल्पाचे, डुडुळवाडीतील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, मोशी कचरा डेपोतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्टला करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने त्या संदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठविली आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने 1 ऑगस्ट रोजी सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान पुण्यात येणार आहेत. त्यादिवशी विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्प राबविला जात आहे. वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत असे 8.80 किलोमीटर अंतराच्या नदी पात्राच्या एका बाजूचे काम पिंपरी- चिंचवड महापालिका करीत आहे. त्यासाठी 276 कोटी 54 लाख खर्च आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती
मोशी येथील कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प उभारला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात 1.07 मेगावॅट वीज तयार केली आहे.
हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर 208 कोटी 36 लाख रुपये खर्च करून उभारला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू केली. डेपोत जमा झालेल्या 700 टन सुक्या कचऱ्यापासून दररोज 14 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. ती वीज प्रतियुनिट 5 रुपये दराने पालिका 20 वर्षे विकत घेणार आहे. ही वीज महापालिका निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण दिल्या आहेत. केंद्र, मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र या ठिकाणी वापरणार आहे. त्यामुळे पालिकेच्या वीजबिलात सुमारे 35 ते 40 टक्के बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन आहे.
मोशीतील कचऱ्यापासून वीजनिर्मिती, नदी सुधार प्रकल्पाचा शुभारंभ आणि बोऱ्हाडेवाडी, चऱ्होलीतील सदनिकांचा चाव्या लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. – शेखर सिंह, महापालिका आयुक्त
पंतप्रधान आवास योजना
पंतप्रधान आवास योजनेतील बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली येथील गृहप्रकल्पांतील सदनिका तयार झाल्या आहेत. बोऱ्हाडेवाडीचा प्रकल्प पूर्णपणे तयार असून, चऱ्होलीतील सात इमारती तयार आहेत. तेथील सदनिकांची चावी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन आहे. तसेच डुडुळवाडीतील प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे.