पाबळ -पाबळ ते पुणे मनपा अशी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून बससेवा शनिवारी (दि. 29) सुरू होत आहे. पाबळ, जातेगाव बुद्रुक, धामारी, मुखई, केंदूर या भागातील नागरिकांमधून या बससेवेचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
शनिवारी दुपारी बारा वाजता खासदार गिरीश बापट साहेब व हेमंत रासने यांचे उपस्थितीत पहिली बस पाबळकडे प्रस्थान करणार आहे. दरम्यान पाबळ पुणे बससेवा सुरू होण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सरपंच मारुती शेळके, माजी कृषी संचालक जे. जे. जाधव, माजी पोलीस उपअधीक्षक नामदेव कोहिणकर, पीएमपी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी नुरुद्दीन इनामदार,
ग्रामपंचायत सदस्य व पीएमटीचे संचालक प्रकाश ढोरे यांनी विशेष प्रयत्न केले. या मार्गावर मनपा ते पाबळ 12 फेऱ्या तर मनपा ते शिक्रापूर 10 अशा दररोज फेऱ्या होणार आहेत. मनपा ते पाबळ 65 रुपये, तर शिक्रापूर ते पाबळ 30 रुपये तिकीट दर असल्याची माहिती पीएमटीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.