शिक्रापूरचे बहीण भाऊ सहा महिन्यांनी घरी
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राधा सोळंके व लक्ष्मण सोळंके या बहीण भावांनी परिस्थितीशी झगडत खाकीचे स्वप्न पूर्ण केलेले असताना पोलीस दलात दाखल झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी दोघे बहीण भाऊ घरी आल्यानंतर वर्दीतील मुलांना सहा महिन्यांनी घरी आल्याचे पाहून त्यांचे आई वडील देखील भारावून गेल्याचे दिसून आले आहे.
शिक्रापूर येथील राधा सोळंके व लक्ष्मण सोळंके या बहिण भावांनी परिस्थितीशी झगडत पोलीस दलात प्रवेश मिळवला असताना मे 2023 मध्ये दोघेही जड अंतकरणाने आपल्या आई वडिलांना सोडून पोलीस प्रशिक्षणासाठी रवाना झाले. दरम्यान, राधाचे ट्रेनिंग अकोल्यात तर लक्ष्मणचे ट्रेनिंग सांगलीत सुरु झाले. सहा महिने दोघांना सांगलीसह रायगड भागातील वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी जावे लागले.
मात्र, दररोज ट्रेनिंग व बंदोबस्त यामध्ये घरी जाण्यास सुट्टी नाही. घरापासून लांब असल्याने आई वडिलांना भेटणे नाही. मात्र, दररोज दोघे आई वडिलांशी फोनवर बोलत व्हिडिओ कॉलवर देखील बोलायचे. मात्र, यावेळी मुलांना पाहून आई वडिल आनंदित होत होते. मात्र, समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची सर्वांना आस लागलेली होती.
दिवाळीची दोघांना पाच दिवस सुट्टी जाहीर झाली. राधा व लक्ष्मण यांना आई वडिलांना भेटण्याची तर आई वडिलांना आपल्या मुलांना भेटण्याची ओढ लागलेली होती. नुकतेच लक्ष्मीपूजनादिवशी दोघे बहीण- भाऊ वर्दीमध्ये दारात हजर झाले.
यावेळी वर्दीतील मुलांना पाहून त्यांची आई गंगा सोळंके व वडील नारायण सोळंके यांना गहिवरून आले. दरम्यान, दोघांना ओवाळत फटाक्याच्या जल्लेषात त्यांचे स्वागत करण्यात आले. आज आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी दिवाळी असल्याचे गंगा सोळंके व नारायण सोळंके यांनी सांगितले.