महात्मा गांधी जयंती दिनी “एल्गार’
बेलसर – पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध म्हणून महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच दि. 2 ऑक्टोबर रोजी सातही गावातील नागरिक हे घरासमोर काळी गुढी उभारून विमानतळाला विरोध दर्शवणार असल्याचा एकमुखी ठराव मंजूर केला.
पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध दर्शवण्यासाठी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्यातर्फे बाधित सात गावांची विरोधी सभा पारगाव (ता.पुरंदर) येथे रविवार (दि.10) पार पडली या सभेमध्ये वरील ठराव करण्यात आला. 2016 पासून विमानतळ विरोधातला संघर्ष उभा केला आहे. विकासाला विरोध नाही पण विकास हा लोकांना बेघर करून होणार नाही. काही वेगळी ठिकाणे राज्य सरकार व केंद्र सरकार त्यांना सुचवली होती. पुरंदर तालुक्यातीलच दुसऱ्या ठिकाणी प्रस्थापित विमानतळ व्हावे जिथे एकही गाव बाधित होणार नाही व एकही शेतकरी विस्थापित होणार नाही अशा प्रकारचा पर्याय सरकारकडे दिला होता. अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.
आमच्या सरकारच्या कालखंडामध्ये तांत्रिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या विमानतळा बाबतच्या गोष्टी समोर मांडल्या गेल्या व ही सात गावे कशी चुकीची आहेत हे सरकार पुढे वारंवार मांडले आहे. आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहोत असा विश्वास आहे. त्यासोबतच पुरंदर तालुक्यातील विविध योजना व प्रकल्प वैयक्तिक दृष्ट्या व सार्वजनिक दृष्ट्या कसे फायद्याचे व तोट्याचे आहेत यावरही संजय जगताप यांनी विरोधकांना टोले मारले.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, डेक्कन बॅंकेचे अध्यक्ष के. डी. मोरे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती महादेव टिळेकर, देविदास कामठे, शहनाज शेख, अमोल कामठे, संतोष हगवणे, जितेंद्र मेमाणे तसेच बाधित सातही गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य त्यासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
पाच हजार कोटींचे गाजर…
पाच हजार कोटी रुपयांचे गाजर अदानी यांनी दाखवले आहे ते तुमच्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नाही तर हे जाणार आहेत गुंतवणूकदारांच्या घशामध्ये जाणार आहे. विमानतळ विरोधी बैठकी संदर्भात उपस्थितीत असलेल्या सर्व मान्यवरांकडून विमानतळाला विरोध दर्शवण्यात आला त्यावेळी श्वासामध्ये श्वास असेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे उद्गार काढून आमदार संजय जगताप यांनी विमानतळाला तीव्र विरोध दर्शवला आहे.