पुणे – थकबाकी तसेच नियमित वसुलीसाठी मनपा मिळकतकर विभागास जवळपास दीडशे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडे मागणीही करण्यात आली आहे. मात्र, निर्णय होत नसल्याने पालिकेच्या एकूणच आर्थिक उत्पन्नाला फटका बसला आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागास कर भरणा सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत तब्बल 1,300 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र, त्यानंतर आर्थिक चाक रुतले असून, गेल्या सव्वा महिन्यांत केवळ 80 कोटी रुपयेच मिळाले आहेत.
मिळकतकर विभागाचे उत्पन्न दि. 8 सप्टेंबरअखेर 1383 कोटी रुपयांवर गेले आहे.
शिवाय 40 टक्के कर सवलत सरसकट सर्व मिळकतधारकांना देण्यात आल्याने महापालिकेचे सुमारे चार लाख मिळकतींचे 40 टक्क्यांनी उत्पन्न घटले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या विभागास 2024-24 या आर्थिक वर्षासाठी या विभागास सुमारे 2,500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले असून, कर वसुलीचे उत्पन्न पाहता मिळकतकर विभागास2 हजार कोटींचे उत्पन्न मिळणेही कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.
विभागाने यंदा सुमारे 12 लाख 25 हजार मिळकतींना बिले वाटप केले असून, आतापर्यंत सव्वाआठ लाख मिळकतींचा कर जमा झाला आहे. तर, दरवर्षी अडीच ते तीन लाख नियमित थकबाकीदार आहेत. आता मार्च 2024 अखेरपर्यंत कर भरणारे जेमतेम दोन लाख मिळकतधारक शिल्लक असून, त्यातही समाविष्ट गावांमधील मिळकतींचा यात समावेश आहे. त्यामुळे प्रशासन थेट मिळकती सील करण्यावर भर देते. या कारवाईसाठी जादा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. दरवर्षी या मोहीमेसाठी कर संकलन विभागास 100 ते 130 अतिरिक्त कर्मचारी दिले जातात. या वर्षी अद्यापही हे कर्मचारी देण्यात आलेले नाहीत.
निवडणुकांचा बसणार फटका
लोकसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मनपा कर्मचाऱ्यांनाही निवडणुकांचे काम दिले जाते. त्यामुळे आताच मिळकतकर विभागास कर्मचारी न दिल्यास यावर्षी उत्पन्नाचा फटका बसण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.
कालावधी आणि मिळकत कर उत्पन्न
15 जून ते 2 ऑगस्ट – 1,302 कोटी रु.
3 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर – 80 कोटी रु.