पुणे – शहरात एक दिवस पावसाचा आणि बाकीचे दिवस “दांडी’, अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. मागील 24 तासांत पावसाची सुरू असलेली भुरभुर आज सकाळपासून बंद झाली आणि लख्ख ऊन पडले. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. गुरूवार, शुक्रवारी पावसाच्या सरी झाल्या. पण, शनिवारपासून पावसाचा जोर ओसरला. रविवारी सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरण असा वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत.
दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तर, दोन दिवसांपासून धुव्वाधार पडत असलेल्या घाटमाथ्यावरही पावसाने आज काही ठिकाणी थोडी विश्रांती घेतल्याचे दिसून येते. गेल्या 24 तासांत ताम्हिणी, खोपोली, कोयना आणि लोणावळा भागात जोरदार पाऊस झाला. तर अन्य घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला होता. कोयना परिसरात सर्वाधिक 179 मिमी पावसाची नोंद झाली. तर ताम्हिणी घाटात 112 आणि लोणावळा येथे 73 तर खोपोली घाटमाथ्यावर 72 मिमी पाऊस झाला.
पावसाची शक्यता दि. 14 सप्टेंबरनंतरच
चक्रीय स्थिती आता मध्य प्रदेश व लगतच्या ईशान्य राजस्थानवर असून, राज्यापासून दूर गेली आहे. द्रोणिका स्थिती ईशान्य राजस्थानपासून ते दक्षिण छत्तीसगढपर्यंत असल्यामुळे त्याचा परिणाम उत्तर विदर्भावर होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर कमी झाला, तरी येत्या 14 आणि 15 सप्टेंबरनंतर पावसाला जोर पुन्हा वाढेल असे हवामान विभागाच्या तज्ज्ञ वैशाली खोबरागडे यांनी सांगितले.