आळंदीत मुक्ताई पादुकांचे पूजनासह साडी-चोळीची भेट
माऊली मंदिरात भाऊबीजेसह दिवाळी पहाट उत्साहात
आळंदी : श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना भाऊबीजेनिमित्त औक्षण करून स्नेहवस्त्र सुपूर्द करीत अर्पण करण्यात आले. यावेळी मंदिरात श्रींच्या दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ऍड. रवींद्र भैयासाहेब पाटील यांनी पाठवलेले स्नेहवस्त्र आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे प्रतिनिधी हभप विचारसागर महाराज लाहुडकर, हर्षदा लाहुडकर यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस स्पर्शित अर्पण करून औक्षण केले. यावेळी स्नेहवस्त्र भेट देण्यात आले.
या स्नेहवस्त्राचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी स्वीकार केला, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे आदिशक्ती मुक्ताईंना भाऊबीजनिमित्त साडी-चोळी भेट दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे दिलेली साडी चोळी स्नेहवस्त्र आदिशक्ती मुक्ताईची पूजा करून मुक्ताईंना अर्पण केल्याचे विचारसागर महाराज यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताई यांचा भाऊबीजेचा सोहळ्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती. आदिशक्ति मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने ज्या ठिकाणी चारही भावंडांचे बालपण गेले अशा संत लीला भूमी आळंदी सिद्धबेटमध्ये श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, श्रीसंत सोपानकाका, श्रीमुक्ताई पादुका पूजन, स्नेहवस्त्र अर्पण करून औक्षण व पुजा करण्यात आली. यावेळी श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, माऊलीदास महाराज, बाळासाहेब वहिले, गजानन महाराज लाहुडकर, केळगाव ग्रामस्थ उपस्थित होते.