21 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर
मंचर – आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, सोमवार (दि. 13) पासून घोडेगाव तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी 2022-23 ते 2027-28 साठी भीमाशंकर साखर कारखान्याचा संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक/निरगुडसर गट – तीन जागा, शिंगवे/रांजणी गट – तीन जागा, अवसरी बुद्रुक/पेठ गट – तीन जागा, मंचर/महाळुंगे गट – तीन जागा, घोडेगाव/शिनोली गट – तीन जागा. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था आणि पणन संस्था प्रतिनिधी – एक जागा, अनुसूचित जाती किंवा जमाती – एक जागा, महिला राखीव प्रतिनिधी – दोन जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – एक जागा, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्गातील प्रतिनिधी – एक जागा अशा प्रकारे एकूण 21 जागांसाठी निवडणूक होत आहे.
नामनिर्देशन पत्र सोमवार (दि. 13) ते शुक्रवार (दि. 17) पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून) तहसीलदार कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे दाखल करावयाचे आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार (दि. 20) सकाळी 11 पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत मंगळवार (दि. 21) ते मंगळवार (दि. 5 जुलै) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, पात्र उमेदवारांचे अंतिम यादी व चिन्ह वाटप बुधवार (दि. 6 जुलै), मतदान रविवार (दि. 17 जुलै) सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, मतमोजणी मंगळवार (दि. 19 जुलै) रोजी होणार आहे.