पिंपरी – आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने काढलेले प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोमवारी (दि. 13) राजपत्रात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आले. आरक्षण सोडतीबाबत आलेल्या 273 हरकती निकाली काढण्यात आल्या आहे.
महापालिका प्रशासनाने ओबीसी आरक्षण वगळता अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी 31 मे रोजी आरक्षण काढले होते. या आरक्षणासंदर्भात 1 ते 6 तारखेदरम्यान हरकती मागविण्यात आल्या होत्या. दिलेल्या मुदतीत 273 हरकती प्राप्त झाल्या होत्या.
महापालिका निवडणुकीसाठी 139 जागा आहेत. त्यामध्ये 70 महिला आणि 69 जागा पुरूषांसाठी राखीव आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आरक्षित आहेत. तर, 114 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.
नागरिकांना आरक्षण सोडतीवर हरकती घेण्यासाठी 1 ते 6 तारखेदरम्यान मुदत देण्यात आली होती.या मुदतीत आरक्षण सोडतीवर 273 हरकती आल्या होत्या. त्यात प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 येथील आरक्षण बदलावर सर्वाधिक 269 हरकती आहेत. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण सोमवारी (दि. 13) शासन राजपत्रात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आले आहे.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, आरक्षण सोडत पद्धतीवर एकही हरकत नव्हती. प्रभागातील आरक्षण बदलावर हरकती होत्या. त्यामुळे याबाबत आयुक्तांचा अभिप्राय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला आहे. तसेच 273 हरकती निकाली काढण्यात आल्या आहे. अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्धीसाठी आज पाठविली आहे. त्यानुसार आरक्षणात काही बदल नाही.