पिंपरी (प्रतिनिधी) – कुदळवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी एचडीएफसी बॅंकेचे एटीएम गॅस कटरने फोडले. यामुळे एटीएम सेंटरमध्ये आग लागल्याने तीन लाख 98 हजार 700 रुपयांची रोकड जळाली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर ब्लॅक स्प्रे मारून एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. ही घटना रविवारी (दि. 12) मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत घडली.
अमोल दिगंबर शिंदे (वय 42, रा. पुणे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी चिखली येथे कुदळवाडी वजनकाट्याजवळ एचडीएफसी बॅंकेचे एटीएम आहे. रविवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तिघेजण तोंडाला रुमाल बांधून एटीएम सेंटरमध्ये आले.
चोरट्यांनी सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना ब्लॅक स्प्रे मारला. एटीएम मशीनचा उजव्या बाजूचा एटीएम वॉल्ट सेफ डोअर गॅस कटरने कापण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मशीन कापत असताना मशीनने अचानक पेट घेतला. त्यात एटीएम, दोन एसी युनिट, दोन सीसीटीव्ही कॅमेरे, लॉबी लाइट, सिलिंग व साईड वॉल फर्निचर तसेच एटीएम मशीन मधील तीन लाख 98 हजार 700 रुपये रोकड जळाली आहे.
बॅंकेच्या कंट्रोल रूममधून मिळाली माहिती
एटीएम सेंटरमध्ये आग लागल्याची माहिती एचडीएफसी बॅंकेच्या कंट्रोल रूमला समजली. त्यानंतर बॅंकेच्या कंट्रोल रूमकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. एटीएम सेंटर जळून खाक झाले होते. पोलिसांनी अग्निशमन विभागाला पाचारण करून आग विझवली. सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर चोरट्यांनी स्प्रे मारल्यामुळे तसेच चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याने चोरट्यांची ओळख पटली नाही. चोरट्यांनी ओळख पटवून त्यांना लवकरच पकडण्याच्या दिशेने तपास सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर यांनी ‘प्रभात’शी बोलताना दिली.