औद्योगिक वसाहतीमधील प्रकार ः पैसे मोजूनही भूखंडासाठी प्रतीक्षाच
लोणी देवकर – इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे साधारणतः 90च्या दशकात उदयास आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत लोणी देवकर आणि बळपुडी येथील अनेकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या; मात्र यातील काही जमीन मालकांनी त्याच्या जमिनींबाबत कोर्टात रीतसर धाव घेतली. तर अद्याप काही लोकांचे जमिनींबाबतची प्रकरणे न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तब्बल अडीच वर्षे उलटून गेले तरी मात्र या भूखंडाबाबत कोणताही ठोस निर्णय अथवा तोडगा निघाला नसल्याने नव उद्योजक नैराश्याच्या खाईत लोटले आहेत.
सन 2020मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने येथील 7 व्यापारी भूखंडासाठी निविदा काढल्या. यामध्ये लोणी देवकर आणि परिसरातील नव उद्योजकांनी सहभाग घेत लाखो रुपये या भूखंडासाठी मोजले; मात्र तब्बल अडीच वर्षे उलटून गेली तरी या उद्योजकांना या व्यापारी भूखंडांचा रीतसर ताबा मिळाला नाही. एमआयडीसीने ज्या व्यापारी भूखंडासाठी निविदा काढल्या होत्या, त्या भूखंडाबाबत मूळ शेतकरी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचा नायालयीन वाद सुरू आहे. संबंधित उद्योजकांनी भूखंडासाठी रक्कम भरून तब्बल अडीच वर्षे उलटून गेली; मात्र ना एमआयडीसीने रीतसर त्या व्यवसायिक भूखंडाचा ताबा त्या उद्योजकांना मिळवून दिला ना त्यावर काही तोडगा काढला.
संबंधित उद्योजकांनी आपल्या व्यापारी भूखंडाबाबत पत्रव्यवहार केला असता एमआयडीसी ने त्यांना इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या व्यापारी भूखंडांमधून निवड करून तो भूखंड आपणास देण्यात येईल असे पत्र दिले. त्यावर संबंधित लोकांनी आपल्या सोयीचे भूखंड एमआयडीसीला कळविले; मात्र त्यावर एमआयडीसीने वेळ काढूनपणा करीत संबंधितांना अद्याप ठोस कार्यवाही केली नाही.
आम्ही हे प्रकरण री-लेआऊटसाठी आमच्या मुख्यालयाला पाठवले आहे. त्यावर काही निर्णय झाल्यावर भूखंड वितरित करण्याबाबत योग्य तो मार्ग निघेल.
-संजीव देशमुख, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी पुणे
भूखंड नसेल तर व्याजासकट पैसे द्या
जवळपास 23 व्यापारी भूखंड शिल्लक असताना व्यापारी भूखंड का देऊ शकत नाही, असा सवाल भूखंडधारक विजय डोंगरे यांनी विचारला आहे. त्यावर कोणतेही उत्तर संबंधित प्रशासनाकडून मिळाले नाही. उलट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पत्राद्वारे उद्योजकांना कळविले की, आपण भूखंडासाठी भरलेली रक्कम आम्ही आपणास परत देऊ; परंतु काही उद्योजक ते पैसे व्याजासकट परत देण्याची मागणी करीत आहेत.
वेदांता-फॉक्सकॉनची पुनरावृत्ती होणार
नुकताच महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित प्रकल्प वेदांता-फॉक्सकॉन इतर राज्यात (गुजरात) गेला आहे. त्याच धर्तीवर इंदापूर (लोणी देवकर) एमआयडीसीने आडमुठी भूमिका घेतली तर असे अनेक प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित होतील, अशी भीती स्थानिक लघुउद्योजक व्यक्त करीत आहेत.