आई शिवाई देवी मंदिरात तयारीची लगबग
जुन्नर – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव साजरा होत असून या उत्सवाची लगबग सुरू आहे.
गडावरील मंदिराबाहेर मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, मंदिरातील सजावट, फुलांची आरास, आभूषणे, पालखी सजावट तसेच भजन, कीर्तन आदींची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती शिवाई देवी मंदिर ट्रस्ट व कूसुर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.
रविवारी (दि. 15) रामेश्वर महाराज शास्त्री, श्रीकांत महाराज दुराफे, माऊली महाराज कुसुरकर व तुकाराम महाराज दुराफे यांच्या हस्ते कुसुर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात विणापूजन संपन्न होणार असून त्यानंतर दिंडी सोहळा किल्ल्यावरील श्री शिवाईदेवी माता मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे.
या उत्सवात अखंड विणा नामस्मरण, काकडा भजन, नेमाचे भजन, हरिपाठ, आरती, हरी कीर्तन, हरिजागर आदी नित्याचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी श्रीकांत दुराफे, दर्शन कबाडी, संतोष राठोड, पांडुरंग घुले, डॉ. गजानन काळे, आत्माराम शास्त्री, हरिदास पालवे शास्त्री, ज्ञानेश्वर कदम या महाराजांची किर्तनसेवा होणार असून सोमवारी (दि. 23) रामेश्वर महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमांसह विजयादशमी व कोजागिरी पौर्णिमेला आयोजित अभिषेक, महापुजेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाई देवी मंदिर ट्रस्ट व कुसुर ग्रामस्थांनी केले आहे.