विविध कार्यक्रमांत स्थानिक नेत्यांचा होतोय हिरमोड
शिरूर तालुक्यातील गावागावांत गटबाजीला उधाण
शेरखान शेख
शिक्रापूर – पूर्वी कोठेही आमदार, खासदार, मंत्री आदी नेते काही कामानिमित्त आल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा गराडा दिसून यायचा, मात्र शिरूर तालुक्यातील स्थिती सध्या काहीशी वेगळीच दिसून येत आहे. तालुक्यात कोठेही आमदार, खासदार, नेते आल्यास त्यांच्या आजूबाजूला ठराविक कार्यकर्त्यांची नांदी दिसून येत आहे. यावरुन शिरूर तालुक्यातील गावागावांत गटबाजीला उधाण आल्याचे दिसून येत आहे.
शिरूर तालुका वेगवेगळ्या गटात विभागला गेला आहे. त्यामुळे तालुक्याला वेगवेगळ्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी लाभले आहेत. यामुळे गावागावांत गट पडल्याचे दिसून येत आहेत. सध्या शिरूर तालुक्यात पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याची दिसून येत आहे. तर कोणत्याही गावात आमदार, खासदार, मंत्री आदी नेते काही कार्यक्रमानिमित्त आलेले असता त्याठिकाणी त्या गावातील कार्यकर्ते उपस्थित असणे गरजेचे असते, मात्र शिरूर तालुक्यात ठराविक दोन चार कार्यकर्ते पदाधिकारी कोठेही आणि कोणत्याही गावात लोकप्रतिनिधी आल्यास तेथे हजर असतात.
त्यामुळे गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हिरमोड होत आहे. तसेच काही गावांमध्ये ठराविक कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसताना गावातील कार्यक्रमात हस्तक्षेप केल्याने आमच्या गावाचे यांना करायचे काय आम्ही येथे समर्थ आहोत, असे खासगीत बोलले जात आहे. संपूर्ण तालुक्यात लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार, खासदारांचे मोजकेच कार्यकर्ते आहेत की काय असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
नावाच्या रिंगटोनची वेगळीच चर्चा
प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोबाइलमध्ये पक्षाच्या तसेच नेत्यांच्या नावांची अनोखी रिंगटोन लावली जात आहे. कोणत्याही कार्यक्रमावेळी फोन आल्यास मोठ्याने आवाज होत पक्षाच्या अथवा नेत्याच्या नावाचा आवाज येतो. त्यामुळे त्या रिंगटोनची वेगळीच चर्चा परिसरात रंगत आहे.