पुणे – थेरगाव क्वीनसोबत अश्लील भाषा आणि धमकीचे रील बनवणारा तिचा मित्र कुणाल राजू कांबळेला पिंपरी सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हा साक्षीसह इंस्टाग्रामवरील रील बनवायचा. याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. तिघांवर कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता यांच्या सोबत अश्लील करत रील बनवणाऱ्या साथीदार मित्र कुणालला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. पोलीसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर कुणालने हात जोडून माफी मागितली आहे.
माझ्या व्हिडीओमुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागतो मला क्षमा करावा असं कुणाल कांबळेने म्हटलं आहे. थेरगाव क्विन या अकाऊंटबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, थेरगाव क्वीनचे ४१ हजार फॉलोअर्स असून ते अधिक वाढवण्याच्या प्रयत्नात अश्लील भाषा, धमकीचे रील बनवत होती. परंतु, हीच अश्लील भाषा, धमकीचे रील यांनी त्यांना गजाआड केलं आहे.