पौड – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान यंत्राबाबत माहिती व्हावी, यासाठी डिजीटल चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ गावोगावी जावून मतदान प्रक्रियेची जनजागृती करणार आहे.
पुढील वर्षी होणार्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदान यंत्राची जनजागृती मोहीम राज्यभर राबवित आहे. इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी एक चित्ररथ सजविण्यात आला आहे. डिजीटल यंत्रणेद्वारे मतदान प्रक्रियेतील लोकांना येणार्या विविध समस्यांचे निराकरण करणार आहे.
मुळशी तालुक्यातही असा चित्ररथ तयार करण्यात आला. तहसील कार्यालयात त्याचा शुभारंभ तहसीलदार रणजित भोसले यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, रवि कडू, समन्वय अधिकारी एस. टी. नवले, मंडल अधिकारी गुलफाम शेख, तलाठी राजेश पोटे, शुभदा शेलार, कोतवाल प्रकाश दिघे, गणेश धनवे, विजय भालेराव आदि उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात हा रथ थांबणार आहे. या रथातील डिजीटल यंत्रणेद्वारे मतदानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राबाबतची माहितीही दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल आणि पंचायत समितीच्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी गावोगाव उपस्थित राहणार आहेत.
-रणजित भोसले, तहसिलदार मुळशी