बाणखेले यांची मराठा आरक्षणासंदर्भात मागणी
राजकीय नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात
मंचर – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा महासंघाचे नेते वसंतराव बाणखेले यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वसंतराव बाणखेले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाबाबत मोठ्या स्वरूपात आंदोलने, मोर्चे, सभा होत असून मराठ्यांना आरक्षण मिळावे याबाबत मराठा समाज वेगवेगळ्या मार्गाने आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. सध्या राज्य सरकारने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लवकरच मराठ्यांना आरक्षण दिले जाईल, याबाबत आश्वासन दिले आहे.
मात्र, असे असले तरीही जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करून मराठा आरक्षणाबाबत जनजागृती व मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, याबाबतची भूमिका लोकांसमोर मांडत आहेत. महाराष्ट्रातून त्यांच्या या भूमिकेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत अनेक राजकीय नेते मात्र आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून आहेत.
मराठा समाजाचे अनेक खासदार-आमदार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तर इतर समाजातून आलेले लोकप्रतिनिधीही याबाबत बोलत नाहीत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील याबाबत आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेले नाही. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपले मत स्पष्ट करावे. जेणेकरून सध्या लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल.
सध्या एकंदरीत परिस्थिती पाहता राजकीय नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन बाणखेले यांनी केले आहे.