सर्व नोंदी मराठीत प्रकाशित करण्याची मागणी
खडकवासला – पुण्यातील हवेली तालुक्यातील सिंहगड -पश्चिम हवेली भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत कुणबी नोंदीचा मोठा खजिना सापडला आहे. याशिवाय हवेली तालुका तहसील कार्यालयातील दप्तरातील जन्म-मृत्यू रजिस्टर तसेच महसूल व इतर ठिकाणच्या दस्तऐवजांतही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी असल्याने सर्व नोंदी मराठीत प्रकाशित करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
सिंहगड भागातील डोणजे येथे 55, शिवापूर येथे 17, खडकवासला येथे 9, नांदेड येथे 105, गोऱ्हे बुद्रुक येथे 30, कोंढापुर येथे 34 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. इतरही शाळेत कुणबी नोंदी आहेत. ब्रिटिश राजवटीत या गावात मराठी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यी दाखल रजिस्टर मध्ये कुणबी नोंदीचा उल्लेख असल्याने या रजिस्ट्ररला महत्व प्राप्त झाले आहे.
सिंहगड भागातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जुन्या शाळांतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी पुढे आले आहेत. लक्ष्मण माताळे, बाजीराव पारगे आदींनी डोणजे येथील जिल्हा परिषद शाळेतील कुणबी नोंदीची माहिती घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा हारगे यांनी सुट्टीतही कार्यकर्त्यांना माहिती दिली.
हवेली तालुक्यातील गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्येही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडत आहेत. याशिवाय सनद, वतन आदी ऐतिहासिक दस्तावेजांसह ब्रिटिश राजवटीतील जनगणना, गॅझेट, महसुली दप्तर आदींमध्ये कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी हवेली तालुका तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष सज्ज आहे.
जन्म मृत्यू रजिस्टर मध्ये 1830 पासून 1930 पर्यंत बहुतेक गावात सरसकट मराठ्यांच्या जातीचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. त्यानंतर काही मात्र काही ठिकाणी जातीच्या पुढे मराठा असा उल्लेख आहे.
-लक्ष्मण माताळे, सकल मराठा समाज