खळद येथे सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद
सासवड – खळद (ता.पुरंदर) येथे अखंड हरिनाम सप्ताहास 50 वर्षे पूर्ण होऊन साजरा होत असणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास नागरिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना अध्यात्माची गोडी लागल्याने दोन ते तीन तास नागरिक मोबाइल, टीव्हीपासून दूर राहत असल्याचे येथे पहावयास मिळत आहे.
सिद्ध सद्गुरू शांतिनाथ महाराज पंढरपूरकर, कीर्तनकेसरी पुंडलिक महाराज खळदकर-नागवडे यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेला नामस्मरण सोहळ्याला 50 वर्षे होत असून नागरिकांनी सहभागी होऊन भगवंताचे नामस्मरण करावे यासाठी आम्ही येतोय ,तुम्हीही या, हरिप्रसादाचा लाभ घ्या असे म्हणत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी किमान दोन तास तरी मोबाइल-टीव्हीपासून दूर राहावे यासाठी हरिनाम सप्ताहात रात्री 9 ते 11 ऐवजी 7 ते 9 किर्तनसेवा व यानंतर संपूर्ण गावाला नियमित महाप्रसाद असा उपक्रम राबवित सप्ताहाचे स्वरूपच बदलले आहे.
ज्या नागरिकांनी महाप्रसादासाठी योगदान दिले आहे अशा सर्वांना माजी उपसरपंच सुरेश रासकर यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात येत आहे. दरम्यान, गावामध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला असून याच महिलांच्या हस्ते या मूर्ती देऊन त्यांचा बहुमान करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविला.
सांप्रदायामध्ये फार मोठी ताकद असून येथे सर्वसामान्यांच्या पासून उच्चपदस्थ सर्वजण लीन होतात, अशावेळी खळद गावाने मोबाइल, टीव्हीच्या आहारी गेलेल्या आजच्या या पिढीला यापासून परावृत्त करण्यासाठी सांप्रदायाची निवड केली याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
– बाळासाहेब कामथे, संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना