पारगाव – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांद्वारे दौंड शहरात सुरु असलेल्या साखळी उपोषणस्थळी आमदार ऍड. राहुल कुल यांनी नुकतीच भेट देऊन मराठा बांधवांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी शासनाने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने हाताळला नाही. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकू शकले नाही.
सर्व कायदेशीर बाबी तपासून टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती शासन अनुकूल असून शासनस्तरावर याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे आमदार ऍड. कुल यांनी नमूद केले.
येत्या काळात देखील मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन कुल यांनी यावेळी दिले.
पारगावात उपोषण
मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळावे यासाठी पारगाव येथे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठी समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवांच्या या आंदोलनाला गावातील सर्व पक्षीय नेतेमंडळींनी पाठिंबा दिला आहे.