शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथून शनिवारी (दि. 26) एक महिला व मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्या मायलेकींचे मृतदेह गणेगाव खालसा येथील एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रांजणगाव एमआयडिसी पोलीस स्टेशन येथे याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर येथील मलठण फाटा येथील लता शिवाजी घोडे ही महिला तिची मुलगी प्रगती घोडे या मुलीला क्लासला सोडायला म्हणून गेली मात्र घरी परत आलीच नाही. याबाबत शिवाजी आबा घोडे (रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरूर) यांनी पत्नी लता शिवाजी घोडे व मुलगी प्रगती शिवाजी घोडे या दोघी बेपत्ता झाल्याबाबत फिर्याद दिली होती.
याबाबतचा तपास शिक्रापूर पोलीस करीत असताना रविवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास गणेगाव खालसा येथील शेतात अनिल थोरात हे शेतामध्ये काम करत असताना त्यांना शेतातील काम करत असताना त्यांना विहिरीमध्ये एक महिला व एका मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
यावेळी रांजणगाव एमआयडिसी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत पाहणी करुन विहिरीतील मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान मृतदेह शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेपत्ता लता शिवाजी घोडे (वय 28) व प्रगती शिवाजी घोडे (वय 6 वर्षे, दोघे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरूर) यांचे असल्याचे समोर आले. याबाबत अनिल बबन थोरात (रा. वाघाळे ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे खबर दिली. तपास पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे करीत आहेत.