कॉंग्रेस प्रथम, राष्ट्रवादी-शिवसेना नंतरच्या स्थानावर
बाळू शिंदे
कापूरहोळ – भोर तालुक्यातील राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील बहुतांशी नेते कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याने कॉंग्रेसमध्ये मेगा भरती चालू असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा परिषद – पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेकजण कॉंग्रेस पक्षात येत असल्याचे दिसत आहे. 20 वर्षांनंतर कॉंग्रेस क्रमांक एकवर, राष्ट्रवादी दुसऱ्या, शिवसेना तिसऱ्या स्थानावर आणि इतर पक्ष असे प्राबल्य दिसत आहे.
भोर तालुक्यात 1999 च्या निवडणूक निकालामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व 2002 पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसत होते. निवडणुकीचा कार्यकाळ पाहता 2002 च्या जिल्ह्या परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 3 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादी, तर पंचायत समितीच्या 6 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी आणि 1 जागा कॉंग्रेसकडे होती.
2007 ला जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 2 जागा राष्ट्रवादीला, 1 जागा राष्ट्रवादी बंडखोर अपक्ष, तर पंचायत समितीच्या 8 पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी आणि 2 जागा कॉंग्रेसला, 1 जागा मनसेकडे होती. 2012 ला जिल्हा परिषद 4 पैकी 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा कॉंग्रेस, 1 जागा शिवसेना, तर पंचायत समितीच्या 8 पैकी 4 जागा राष्ट्रवादी, 2 जागा कॉंग्रेस, 2 जागा शिवसेना अशी स्थिती होती.
2017 ला जिल्हा परिषदेच्या 3 पैकी 1 जागा राष्ट्रवादी, 1 जागा कॉंग्रेस, 1 जागा शिवसेना, तर पंचायत समितीच्या 6 पैकी 4 जागा राष्ट्रवादी, 1 जागा कॉंग्रेस आणि 1 जागा शिवसेनेकडे आहे. हा आलेख पाहता राष्ट्रवादीच्या मतांत दिवसेंदिवस घट झाली असून, शिवसेना जागेवरच आहे.
निवडणूक समोर ठेवून कॉंग्रेस प्रवेश
महाआघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव विधानसभा अध्यक्ष पदासाठी व कॅबिनेट मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला होत आहे. इतर पक्षांमध्ये स्वतःच्या पक्षामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारीसाठी अस्थिरता निर्माण झाल्यामुळे अनेकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.