लोणी काळभोर येथील मुक्कामाबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
लोणी काळभोर – जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदा लोणी काळभोर (ता. हवेली) गावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी आणण्याबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे रविवारी (दि. 4) जून लोणी काळभोर ग्रामस्थांची एक बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत पालखी सोहळ्याबाबत काय भूमिका घ्यायची, या संदर्भात लोणी काळभोर ग्रामस्थ निर्णय घेणार आहेत.
जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात न थांबविण्याचा निर्णय पालखी सोहळा प्रमुखांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदा घेतला आहे. विसाव्यासाठी सोहळा उरुळी कांचन गावात न्यायचा नाही असेही सोहळा प्रमुखांनी ठरवले आहे. त्यामुळे लोणी काळभोर व उरुळी कांचन परीसरातील भाविकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा उरुळी कांचनचे सरपंच आणि ग्रामस्थांनी दिला आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूहून शनिवारी (दि. 10) प्रस्थान होणार आहे. गुरुवारी (दि. 15) सकाळी लोणी काळभोर येथून निघून यवत मुक्कामी जाणार आहे.
गुरुवारी दुपारी विसाव्यासाठी परंपरेप्रमाणे उरुळी कांचनचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात येत असतो; परंतु गेल्या काही वर्षांपासून पालखी सोहळ्याचे विश्वस्तांच्या विसंवादाने हा सोहळा गावात आणण्यास नकार दिला जात आहे. पालखी सोहळा विश्वस्तांनी विठ्ठल मंदिर, लोणी काळभोर येथे थांबणारा सोहळा लोणी काळभोर गावात न थांबवता तो कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरच अपुऱ्या जागेत विसावा घेऊन तिथून पुढे मार्गस्थ होणार आहे, अशी भूमिका पालखी सोहळा समितीने घेतली आहे. लोणी काळभोर व उरुळी कांचन गावातील पालखी सोहळ्याच्या विसावा व मुक्कामाबाबतीत निर्णयासाठी रविवारी बैठक आयोजित केली आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सालाबाद प्रमाणे लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी येण्यासंदर्भात संस्थान व पालखी सोहळा प्रमुख यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आहे. तरीही पालखी सोहळा प्रमुख व प्रशासनाकडून मुक्काम स्थळाबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नाही. अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे 4 जूनला ग्रामस्थांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
– योगेश काळभोर, (सरपंच, लोणी काळभोर, अध्यक्ष, श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट)