पाककला स्पर्धेत कुरुळीच्या बर्गेवस्तीची शाळा प्रथम
चिंबळी – आहार व आरोग्य हे एकमेकांशी निगडित असून आपल्या आहारात विविध पोषक घटकांचा समावेश पालकांनी केल्यास मुले निश्चितच सुदृढ होतील, असे सहायक गटविकास अधिकारी जयश्री दोंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत बर्गेवस्ती शाळेने प्रथम क्रमांक पटकावल्याचे कुरुळी केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी सांगितले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण तालुकास्तरीय पाककला स्पर्धा शालेय पोषण आहार, पंचायत समिती खेड यांचे वतीने गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नं. 2 येथे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील 17 शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजयी बर्गेवस्ती शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती चिंबळी व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन व कौतुक केले. स्पर्धेचे उद्घाटन सहायक गटविकास अधिकारी जयश्री दोंदेसमवेत शालेय पोषण आहार अधीक्षक दत्तात्रय भारमळ, विस्तार अधिकारी श्रीरंग चिमटे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेत अर्चना दुकानदार यांनी विविध तृणधान्य वापरून पाककृती सादर केली व मायादेवी जाधव (सुर्वे) व आशा जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन जितेंद्र डेरे तर मनोज केंगले यांनी आभार मानले.
तृणधान्याचे महत्व
केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर म्हणाले, हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करत असताना आपल्या आहारातील तृणधान्याचे महत्व विशद करून आज त्याचे किती महत्व आहे हे सांगितले. तसेच स्पर्धेचे विविध निकष समजावून सांगितले. परीक्षक म्हणून विस्तार अधिकारी नंदा पवार, सुनंदा शेवकरी, ज्योती चिलेकर, श्रीरंग चिमटे, केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर, विजय सुरकुले, मुख्याध्यापक सुनीता पोटे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमासाठी शालेय पोषण आहार विभागाचे रूपाली कांबळे, प्रतिभा भांगे यांचेसह विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख, सर्व बीआरसी स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.