पूर्व हवेलीत इच्छुकांची उठबस वाढली ः निवडणुकीसाठी जोरदार तयारी
संदीप बोडके
थेऊर- हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील इच्छुकांनी संभाव्य गट व गण रचनेच्या आधारे राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची जोरदार तयारी सुरू केल्याने कार्यकर्त्यांची गावागावांत उठबस वाढली आहे. त्यामुळे इच्छुकांनी कार्यकर्त्यांना चुचकारण्यास सुरुवात केल्याने त्यांचे महत्व वाढले आहे.
हवेली तालुक्यातील बहुतांश गावे महानगरपालिकेला जोडली गेल्याने तालुक्यातील गट व गणांची संख्या कमी झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात व वाड्या वस्त्यांवर असल्याने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात खऱ्या अर्थाने राजकीय फिवर जाणवत असून इच्छुकांनी नातेवाईकांचा गोतावळा, कार्यकर्त्यांचा संच व प्रत्येक गावातील विविध गटांना हाताळत आपल्या राजकीय आखाड्यातील समीकरणे जुळवण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची गट व गण रचना लक्षात घेऊन अनेक नेत्यांनी अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सपाटा लावला आहे. गल्ली बोळातील, वाड्या वस्त्यांवरील व गावा गावांतील कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळू लागल्याने त्यांचा भाव वधारला आहे. नवीन गट व गण रचना लक्षात घेता नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत.
काहीजणांनी मतदारसंघाची चाचपणी सुरू करुन राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी फिल्डींग लावली आहे. करोनाचे निर्बंध शिथिल होणार म्हणून यात्रा, जत्रा व लग्न समारंभात गाठी भेटी वाढवल्या आहेत. इच्छुकांच्या यादीत आपले नाव व स्थान कायम चर्चेत कसे राहील. त्यादृष्टीने यंत्रणा कामाला लावली आहे. सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.
गट व गण रचनेकडे सर्वपक्षीयांचे लक्ष
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचा हवेलीच्या पूर्व पट्ट्यात दांडगा जनसंपर्क आहे. अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक त्यांच्या संपर्कात असल्याने पूर्व भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य जाणवत असले तरी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराज गटातटावर इतर पक्षाची मदार अवलंबून आहे. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी व कट्टर शिवसैनिक यांच्यावर शिवसेनेची नौका अवलंबून आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भाजपचे प्रदीप कंद यांनी विजयश्री खेचून आणल्याने भाजपाचे कार्यकर्ते चार्जिंग झाले असून त्यांचेही गट व गण रचनेवर लक्ष लागले आहे. कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व पूर्व हवेलीत कमी जाणवत असले तरी राजकीय घडामोडींनी वेग घेतल्यास त्यांचे महत्त्वही अधोरेखित राहणार आहे.