सहकारमंत्री वळसे पाटील ः “सांज दिवाळी’ या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद
मंचर- रोटरी क्लब ऑफ मंचरचे काम कौतुकास्पद असून, रोटरीच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावांमध्ये समाजोपयोगी कामे झाली आहेत, त्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह गरजू नागरिकांना त्याचा लाभ होत आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
एकलहरे (ता. आंबेगाव) येथे रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या वतीने आयोजित सांज दिवाळी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार राजेश कानसकर, रोटरीचे अध्यक्ष प्रशांत बागल, सचिव सचिन निघोट, सचिन काजळे, डॉ. मोहन साळी, डॉ. सतीश गुजराथी, अभियंता बाळासाहेब पोखरकर,अभियंता सचिन बांगर, ऍड. बाळासाहेब पोखरकर, डॉ. भूषण साळी, दीपक चवरे, ऍड. अनिल पोखरकर,
डॉ. रवींद्र दाते, तुषार कराळे, जयेश शिंदे, सचिन चिखले, महेश मोरे, आदिनाथ थोरात, माउली चव्हाण, बाबाजी वाळुंज, विकास जाधव उपस्थित होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रशांत बागल म्हणाले, रोटरीचा पदभार घेतल्यानंतर 4 महिन्यात विविध विकासकामे झाली आहेत. 18 प्रोजेक्ट करून तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न केला,
त्यामध्ये वडगाव काशिंबेग येथील शाळेला स्वच्छतागृह आणि अवसरी बुद्रुक विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना बाक देण्यात आले. विशेषतः अजूनही शाळा सुधारसाठी रोटरीच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. यावेळी पुणे येथील “रंग सप्तसुरां’चे या सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सूत्रसंचालन जनार्दन मेंगडे यांनी केले, सचिन निघोट यांनी आभार मानले.