आमच्यामुळेच रस्ता काम मार्गी ः मांडवगण फराटा येथे राजकीय चढाओढ
मांडवगण फराटा – मांडवगण फराटा – तांदळी या मुख्य रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडून पाणी साचत होते. याबाबत अनेकवेळा नागरिकांनी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
खड्डे पाण्याने पूर्ण भरलेले असल्याने छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी केली आहे. परंतु आमच्यामुळेच रस्त्याचे काम मार्गी लागले आहे, असा नारा देत राजकीय श्रेय घेण्यासाठी मांडवगण फराटा येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.
मांडवगण फराटा – तांदळी रस्ता दुरुस्ती ताबडतोब झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. रस्ता कोणाच्या प्रयत्नांमुळे झाला यापेक्षा दुरुस्ती झाली असे मत नागरिकांनी व्यक्त केले. बाजारतळ व तुकाईमंदिरापर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. वाहन चालवताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तोही रस्ता दुरुस्त झाला असता तर फार बरे झाले असते, असे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
मांडवगण फराटा – तांदळी रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत, तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. तसेच खड्डे बुजविण्यासाठी अगोदरपासूनच आम्ही प्रयत्न करीत होतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यावरून मांडवगण-तांदळी रस्ता दुरूस्ती श्रेयासाठी राजकीय चढाओढ लागल्याचे यावेळी दिसून आले.
मांडवगण-तांदळी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार लगेच दुरुस्ती करण्याची मागणी मान्य केली. तसेच रस्ताही तयार करण्यात आला आहे.
-सुधीर फराटे, तालुकाप्रमुख शिवसेना
रस्ता दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शिरूर यांना अनेकवेळा सांगितले; परंतु रस्ता मंजूर असल्याने दुरुस्ती करण्याचे थांबले होते. आमदार अशोक पवार यांना सद्यपरिस्थिती सांगितल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीविषयी सूचना केल्याने रस्ता त्वरीत दुरुस्त झाला आहे.
-बाबासाहेब फराटे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस
रस्ता हा तुकाई मंदिरापर्यंत खराब झाला आहे; परंतु नवीन रस्त्याच्या कामाला येत्या दोन ते तीन दिवसांत सुरूवात होणार आहे. मुरूमाचे वाहन चिखलात फसत असल्याने उर्वरित ठिकाणी मुरूम टाकला गेला नाही.
-शिवाजी कदम, सरपंच मांडवगण फराटा