विनोद मोहिते
इस्लामपूर : इस्लामपुरातील जुनी गणेश भाजी मंडई स्थलांतराचा वाद पेटला आहे.आज शनिवारी जुन्या मंडईत बसण्यास विक्रेत्यांना पोलिसांनी अटकाव केल्याने तणावात आणखी भर पडली. अनधिकृतपणे प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगरल्याने विक्रेत्यांनी थेट नगरपालिका इमारतीच्या आवारामध्ये मंडई भरवली आहे. नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडला.
काल शुक्रवारी सकाळी मंडई परिसरामध्ये तणावाचे वातावरण झाले होते.”आम्ही इथंच बसणार अशी विक्रेत्यांची भूमिका तर इथं बसायचे नाही असा पवित्रा नगरपालिका प्रशासनाचा घेतला होता. माजी नगरसेवक कपिल ओसवाल, संघर्ष समितीचे शाकीर तांबोळी यांनी या निर्णयाला स्थिगीती मिळावी म्हणून विक्रेत्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती केली. पण वाहतुकीला अडथळा ठरणारी जुनी मंडई नव्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज मंडईत ५ तारखे पासून सुरू झाल्याचे निवेदन माध्यमाना दिले आहे. जुन्या जागेत बसणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
गेल्या आठवड्यापासून नगरपालिका प्रशासनाने चौकाचौकात जुनी भाजी मंडई नव्या प्रशस्त जागेत पाच फेब्रुवारी पासून स्थलांतरित होणार असल्याचे फलक लावले होते.यामुळे आज सकाळ पासून जुन्या मंडईत पोलीस बंदोबस्त होता. कोणत्याही विक्रेत्यांना बसू दिले नाही. तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही जणांचा भाजी पाला जप्त केला. यानंतर विक्रेत्यांना स्थलांतरित जागेत जाण्याची विनंती करण्यात आली. पण ती धुडावत विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवारामध्ये भरवली मंडई आहे.
शहराच्या पश्चिमेला गणेश मंदिराच्या परिसरात जुनी भाजी मंडई आहे. या मंडईला शंभर वर्षाचा इतिहास आहे. यापूर्वी २००६ साली ही मंडई स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला होता. पण तेव्हा तिथे सुविधा नव्हत्या. सुविधा द्या मग जातो असे त्यावेळी भूमिका होती. आतां सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मंडई नव्या जागेतच भरेल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. याप्रश्नावर दोन तीन दिवसांच्या पूर्वी हेच विक्रेते नगरपालिकेच्या आवारात आले होते. तासभर ठाण मांडून होते. शुक्रवारी पुन्हा त्यांची निराशा झाली. उद्या काय बघू म्हणत विक्रेते निघून गेले होते. सध्या सत्तारूढ अथवा विरोधी कोणत्याही नगरसेवकांनी प्रश्नांची दाखल घेतलेली नाही. आज शनिवारी सकाळी पुन्हा वाद पेटला अन् विक्रेत्यांनी थेट नगरपालिका आवार गाठले.अन् मंडई भरवली आहे. साडे नऊ वाजेपर्यंत कोणीही प्रशासनाचे फिरकले नाही.