पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेणार पालिका आयुक्तांची भेट
शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा घेणार आढावा
पुणे – महापालिका निवडणुका अवघ्या वर्षभरावर आल्याने शहराच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेणार आहेत. पुढील काही दिवसात ही भेट होणार असल्याची माहिती मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी दिली.
दरम्यान, ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात आपल्या घरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या कामाचा तसेच महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांनी शहराच्या प्रश्नांबाबत आयुक्तांची भेट घेण्याची विनंती केली होती, त्यांनी त्यास होकार दर्शविल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. मनसे नेते बाबु वागस्कर आणि अनिल शिंदारे आदी उपस्थित होते.
या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांकडून तसेच 14 सदस्यांच्या कोअर कमिटीकडून निवडणुकांच्या आधीच आपल्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती करणार आहोत किंवा नाहीत हे न ठरवता निवडणुकीआधी निर्णय घ्यावा तसेच पक्षाने स्वबळावर ही निवडणूक लढवावी, अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
दरम्यान, या बैठकीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षाकडून “राजदूत’ ही संकल्पना मांडण्यात आली असून त्यानुसार, पक्षाच्या गट अध्यक्षांची राजदूत म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा नारा
निवडणुकीसाठी जवळपास पक्षाला 179 उमेदवारांची गरज भासणार असून केवळ जागा भरायच्या म्हणून पक्षाने उमेदवार देऊ नयेत, अशी मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली, अशा “जागा भरो’ उमेदवारांचा फटका पक्षाला तसेच आसपासच्या लगतच्या उमेदवारांना बसत असून पक्षाने एक ठराविक उमेदवारांचा आकडा निश्चित करून कोणाशीही युती न करता निवडणुकीस सामोरे जावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.