– राहुल गणगे
पुणे -जिल्ह्यात बारामती, शिरूर, भोर, राजगुरूनगर, दौंड, चाकण, सासवड, इंदापूर, जेजुरी, आळंदी, जुन्नर, तळेगाव दाभाडे, लोणावळा अशा एकूण तेरा नगरपरिषदा आहेत. सध्या नगरपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.
अनेक नगरपरिषदांचा कार्यकाल संपला आहे. तर अनेक ठिकाणी मुख्याधिकारी पदांची जागा रिक्त आहे, त्यामुळे नगरपरिषदांचे कारभारी बनले प्रभारी, अशी अवस्था जिल्ह्यातील नगरपरिषदांची झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकांकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
सर्वांत मोठ्या बारामती नगरपरिषदेवर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे; परंतु मुख्याधिकारी यांची बदली झाल्यामुळे नगरपरिषदेची धुरा सध्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे आहे. शिरूर नगरपरिषदेवर शिरूर विकास आघाडीची सत्ता आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी म्हणून तहसीलदार लैला शेख कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे शिरूर नगरपरिषदेसाठी तरूणाई सरसावत असताना दिसून येत आहे. भोर नगरपालिकेवर सध्या कॉंग्रेसचा झेंडा आहे. सध्या मुख्याधिकारी नसल्याने नवनिर्वाचित तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाल संपल्यामुळे सध्या प्रशासक म्हणून प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण काम पाहत आहेत. चाकण नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता होती. सध्या कार्यकाल संपल्याने तेथेही प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडेच प्रशासकपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे चाकणकरांचे सध्या निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष लागले आहे.
सासवड नगरपरिषदेवर सध्या कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. तर मुख्याधिकारी यांची बदली झाल्यामुळे सध्या नायब तहसीलदार कार्यभार पाहत आहेत. दौंड नगरपरिषदेचा चार्जदेखील सध्या तहसीलदार सांभाळत आहेत. तर दौंड नगरपरिषदेत कटारिया गटाचा नगराध्यक्ष आहे. तर राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे.
इंदापूर नगरपरिषदेची सत्ता हर्षवर्धन पाटील ताब्यात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ तर कॉंग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत; परंतु सध्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकी भत्तजप, राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळू शकते. जेजुरी नगरपरिषदेवर सध्या कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे.
आळंदी नगरपरिषद सध्या भाजपच्या ताब्यात आहे. ही नगरपरिषद विविध घडामोडींमुळे चर्चेत असते. लोणावळा नगरपरिषदेवर सध्या भाजपची सत्ता आहे. यामध्ये भाजपचे नऊ, कॉंग्रेसचे सहा, आरपीआय एक व अपक्ष दोन नगरसेवक आहेत. जुन्नर नगरपरिषदेवर शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता आहे.
सहा वर्षांत तळेगाव दाभाडेला सात मुख्याधिकारी
गेल्या अनेक वर्षांपासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी व महत्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही नियुक्ती प्रलंबित आहे. त्यामुळे गेली पाच-सहा वर्षांपासून नगरपरिषद प्रशासनाचा कारभार प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवरच सुरु आहे. त्यामुळे प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
अशा परिस्थितीमध्ये नगरसेवकांना विकासकामांचे निर्णय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर नागरिकांची कामे होत नसल्याने त्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित मुख्याधिकाऱ्यांसह इतर सर्व रिक्त पदे भरण्याची आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.
मंचर, घोडेगाव व पौडला नगरपंचायतीची मागणी
मंचर शहर हे तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. 102 गावांची बाजारपेठ आहे. शहराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या 21 हजारांवर गेली आहे. प्रभाग रचनेनुसार 50 हजारांच्या पुढे लोकसंख्या आहे. मंचर शहराचा वाढता विस्तार पाहता विकासकामांसाठी ग्रामपंचायतीवर काही प्रमाणात मर्यादा येतात.
त्यासाठी मंचर येथे नगरपंचायत व्हावी, अशी मागणी मंचरकरांमधून होत आहे. मुळशी तालुक्यातील पौड येथे नगरपंचायत होण्याची गरज आहे. या भागात तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषद होण्याची अनेक दिवसांची नागरिकांची मागणी आहे.
तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत किंवा नगरपरिषद असावी. त्याप्रमाणे सरकारने निर्णयही घेतला होता; परंतु सद्यस्थितीत याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.