आमदार बेनके : केंद्र सरकार सकारात्मक
नारायणगाव : जुन्नर परिसरातील प्राचीन लेणी वारसा संवर्धनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूदीची मागणी करावी, अशी विनंती आमदार अतुल बेनके यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली होती. विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे जुन्नर परिसरातील प्राचीन लेणी वारसा संवर्धनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूदीची मागणी केली आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील लोकसंस्कृतीला सुमारे अडीच हजार वर्षांचा प्राचीन वारसा आहे. हा वारसा संवर्धनाबरोबरच जुन्नर तालुक्याला बौद्धकालीन लेण्यांचा देखील वारसा लाभलेला आहे. मात्र हा वारसा दुर्लक्षित असून, हा वारसा संवर्धनातून पर्यटन विकास करण्यासाठी या परिसराचा हेरिटेज पर्यटन विकास आराखडा अजंठा वेरूळ लेणी समूहांप्रमाणे करण्यासाठी केंद्रिय सांस्कृतिक आणि पुरातत्त्व विभागाला भरीव निधीची गरज भासणार आहे.
अशा प्रकारच्या वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डॉप्ट ए हेरिटेज 2.0 अंतर्गत जुन्नर (पुणे) तालुक्यातील प्राचिन बौद्धकालिन लेण्यांच्या विकासासाठी केंद्रिय अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना महाराष्ट्र शासनाकडून पत्र व्यवहार करून आमदार बेनके यांनी मागणी केली आहे.
तसेच तालुक्यातील पर्यटन विकास आणि संवर्धन करत असताना फक्त रस्ते आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित न करता तालुक्यातील पुरातन वारसा जपण्याचे आणि नव्याने जगापुढे आणण्याचा मानस असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.